शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार

By नितीन काळेल | Published: March 27, 2024 05:44 PM2024-03-27T17:44:14+5:302024-03-27T17:51:35+5:30

महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच

Sharad Pawar in Satara next Friday, testing for Lok Sabha The candidate will be decided | शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार

शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार

सातारा : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढत असून महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी साताऱ्याला धावती भेट देत असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीची चाचपणी करणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा आघाडीचा उमेदवार लवकरच ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन १२ दिवस झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी तसेच महायुतीतूनही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरलेला नाही. महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. यावर अजून तोडगा निघालेला नाही. तर आघाडीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट निवडणूक लढविणार आहे. या गटाचाही उमेदवार अजून निश्चित नाही. 

राष्ट्रवादी अंतर्गतच काही रुसवे-फुगवे आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चीत करण्यात वेळ जात आहे. त्यातच महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच शरद पवार आपले फासे टाकतील अशीही अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार हे शुक्रवारी सकाळी साताऱ्यात येत आहेत. काही तासासाठीच ते येत असून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहेत. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असावा, कोणाचा विरोध आहे का ? याचीही चाचपणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शुक्रवारच्या या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेलिकाॅप्टरने येणार;  इंडिया आघाडी नेत्यांबरोबरही बैठक..

शुक्रवारी सकाळी शरद पवार हे मुंबईवरून हेलिकॉप्टरने साताऱ्यात येणार आहेत. त्यानंतर ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादीची बैठक सातारा शहराजवळ कोडोली येथील साई सम्राट हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवाराबद्दल चर्चा करणार आहेत.  तर दुपारी अडीच वाजता इंडिया आघाडी नेत्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते मुंबईला जाणार आहेत. 

Web Title: Sharad Pawar in Satara next Friday, testing for Lok Sabha The candidate will be decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.