माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?

By नितीन काळेल | Published: April 28, 2024 07:02 PM2024-04-28T19:02:09+5:302024-04-28T19:03:46+5:30

राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस अन् प्रतिष्ठेचा सामना

Madha MP new every time; who now Will be now? | माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?

माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?

सातारा : माढा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची झाली असून, राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच चुरस आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाजी कोण मारणार? हा प्रश्न असतानाच माढ्याचा खासदार आतापर्यंत प्रत्येकवेळी नवा झाला आहे. ही परंपरा यंदा टिकणार की खासदार बदलणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.

देशात २००८ मध्ये लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यावेळी माढा मतदारसंघ अस्तित्वात आला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा, सांगोला, करमाळा आणि माळशिरस विधानसभेचे मतदारसंघ येतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होतो. २००९ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांना माढ्याची निवडणूक लढविण्याचा आग्रह झाला. त्यामुळे पवार माढ्यातून रिंगणात उतरले. तर विरोधात भाजपचे सुभाष देशमुख होते. तसेच रासपचे महादेव जानकरही रिंगणात होते. तसे पाहता, माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते.

त्या तुलनेत भाजपची ताकद नगण्य होती. अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांनी तब्बल ३ लाखांहून अधिक मतांनी भाजपचा पराभव केला. पवार हे पुणे जिल्ह्यातील असलेतरी माढ्याचे पहिले खासदार ठरले. २०१४ च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरवले. त्यावेळी राज्यात महायुती झाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना या महायुतीचा भाग होती. त्यामुळे मतदारसंघ स्वाभिमानीला गेल्यावर सदाभाऊ खोत यांना उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत खोत यांनी जोरदार टक्कर दिली. पण त्यांचा मोहिते-पाटील यांनी २५ हजार मतांनी पराभव केला. मोहिते-पाटील दुसरे खासदार ठरले. ते सोलापूर जिल्ह्यातील अकलुजचे आहेत.

माढ्याची तिसरी निवडणूक २०१९ ला झाली. या निवडणुकीत दोघा मित्रात लढाई झाली. भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना, तर राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना उमेदवारी दिली. निवडणूक चुरशीची झाली. पण पहिल्यांदाच मतदारसंघात रणजितसिंह यांच्या रूपाने कमळ फुलले. त्यांनी शिंदे यांचा ८५ हजार मतांनी पराभव केला. रणजितसिंह हे सातारा जिल्ह्यातील फलटणचे. त्यामुळे माढ्याचा खासदार तीन निवडणुकांत वेगवेगळा झाला.

माढा लोकसभेची आताची चौथी निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांत सामना आहे. मतदारसंघातील नेत्यांच्या भूमिकेमुळे फाटाफूट झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत चुरस वाढलीय. त्यामुळे माढा मतदारसंघ परंपरेप्रमाणे चौथ्या निवडणुकीत नवीन खासदार देणार की आहे तोच ठेवणार, हे ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीचा नेहमी नवा उमेदवार; भाजपकडून रणजितसिंह पुन्हा...
माढा मतदारसंघातील चौथी निवडणूकही राष्ट्रवादी आणि भाजपमध्येच होत आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकवेळी नवीन उमेदवार देण्यात आला आहे. यामध्ये अकलुजच्या मोहिते-पाटील घराण्यात दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तर भाजपने पहिल्या दोन निवडणुकांत वेगवेगळे उमेदवार दिले. तर तिसऱ्या निवडणुकीत विजयी झालेले खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर भाजपने आताच्या निवडणुकीतही विश्वास दाखविला आहे. आताच्या या निवडणुकीत राजकीय समीकरणे खूप बदलली आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार होत आहे.

Web Title: Madha MP new every time; who now Will be now?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.