रात्री लग्न करून आलेली नववधू पहाटेच दागिने घेऊन पसार

By विजय.सैतवाल | Published: April 22, 2024 11:46 PM2024-04-22T23:46:34+5:302024-04-22T23:46:59+5:30

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लावले दुसरे लग्न : नववधूसह दलाल महिला, मैत्रिणीविरुद्ध गुन्हा

bride who got married at night and ran away with the ornaments early in the morning | रात्री लग्न करून आलेली नववधू पहाटेच दागिने घेऊन पसार

रात्री लग्न करून आलेली नववधू पहाटेच दागिने घेऊन पसार

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : एक लाख रुपये देवून लग्न पार पडले अन् घरी आल्यानंतर थकल्यामुळे सर्वजण घरात गाढ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास लग्नातील सोन्याचे दागिने घेवून नव वधू पसार झाली. याप्रकरणी लग्न जुळविणाऱ्या पूजा विजय माने (३२, रा. महाडीकवाडी, सांगली), नववधू नंदीनी राजू गायकवाड (रा.  अकोला), तिची मैत्रीण नीता अर्जुन गणवार यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात सोमवार, २२ एप्रिल रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे येथून पसार झाल्यानंतर याच तरुणीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिले. त्यानंतर तेथेही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिकेत व्हॉलमन म्हणून नोकरीस असलेले शरद काशिनाथ चौधरी यांचा मुलगा मयुर याचे लग्न करायचे असल्याने त्यासंदर्भात १३ फेब्रुवारी रोजी त्यांना पूजा विजय माने या महिलेचा फोन आला. तिने आमच्याकडे मुलगी असून तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे येवून मुलगी बघून घ्या असे सांगितले.  मुलगी पाहिल्यानंतर पसंती झाली व  माने या महिलेने त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली. परंतु चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले.

१६ मार्च रोजी तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये मयूर चौधरी याचे नंदीनी गायकवाड या तरुणीसोबत लग्न लागले. यावेळी मुलीकडून पूजा माने, नंदीनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ असे हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले.

चारचाकीत बसून पहाटेच पसार

लग्न आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री सर्वजण गाढ झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास नववधू नंदीनी व तिची मैत्रीण या घरात दिसल्या नाही. त्यामुळे चौधरी कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला. मात्र तरी देखील त्या सापडल्या नाहीत. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, पहाटेच्या सुमारास एक काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिले.

दुसऱ्याचा लावून दिला विवाह, तेथूनही पसार

नववधूसह तिची मैत्रीण घरातून निघून गेल्याचे चौधरी यांनी पूजा माने या महिलेला सांगितले असता तिने शोध घेवून सांगते  असे म्हणत आपला मोबाईल बंद करुन ठेवला. बरेच दिवस संपर्क झालाच नाही. चौधरी यांचे साडू रवींद्र चौधरी हे त्यांना भेटले असता त्यांनी सांगितले की,  छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पूजा व नंदीनीने फसवणूक करून लग्ल लावून दिल्याची बातमी वाचली. त्या वेळी चौधरी यांना समजले की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिरुर येथे पूजा माने या महिलेने नंदीनीचे वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत लग्न लावून दिले आहे. त्यामुळे फसवणूक केल्याप्रकरणी चौधरी यांनी शनिपेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार नववधूसह अन्य दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: bride who got married at night and ran away with the ornaments early in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.