आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:42 PM2024-04-20T14:42:57+5:302024-04-20T14:44:27+5:30

Lok Sabha Election 2024 : दोन दिवसांत बविआचा उमेदवाराचे नाव होणार घोषित

Lok Sabha Election 2024 : When you fight alone, you win - MLA Hitendra Thakur | आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर

आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे - आमदार हितेंद्र ठाकूर

- मंगेश कराळे

नालासोपारा : विरारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बविआची सभा शुक्रवारी पार पडली. या सभेत एक दोन दिवसात सर्वानुमते उमेदवार जाहीर होईल, मात्र प्रत्येक कार्यकर्ता हाच उमेदवार आहे असे समजून कामाला लागा असा संदेश बविआ अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना दिला. युती आघाडीवर टीका करण्यात मला रस नाही. आपण केलेली कामे ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचवा. जेव्हा जेव्हा आपण कोणाची मदत न घेता एकट्याने लढतो तेव्हा जिंकतो. आताही आघाडी व युतीने उमेदवार दिलेला आहे. आपण एकट्याने लढणार म्हणजे आपला विजय निश्चित आहे अशी मार्मिक टिप्पणी देखील ठाकूर यांनी केली.

या भव्य सभेला पक्षाचे दोन्ही आमदार, माजी खासदार, सर्व माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, आजी माजी जिल्हा परिषद सभापती, सदस्य, पंचायत समिती सभापती, सदस्य ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच जिल्हा व तालुक्याचे अध्यक्ष, ऊपाध्यक्ष पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बविआचे लोकनेते हितेंद्र ठाकूर व कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी "लोकसभेची निवडणूक लढवायची का?" असे विचारताच कार्यकर्त्यांनी 'हो' म्हणत घोषणा द्यायला सुरुवात केली. तेव्हा ठाकूर यांनी, "नुसतं लोकसभा लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची" असा निर्धार बोलवून दाखवला.

जिल्ह्यात आपले तीन आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य व सर्वात जास्त ग्रामपंचायत तसेच वसई विरार सारखी मोठी महानगरपालिका यांवर आपल्या पक्षाचे एकहाती वर्चस्व असताना व जवळपास ५०% मतदार हे आपले असल्यामुळे यावेळचा खासदार हा आपल्याच पक्षाचा असणार असा विश्वास आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे मोदी व फडणवीस यांच्या कार्याचे व विकास कामाचे पाढे वाचताना, त्यांनी स्वतः १० वर्षात आपल्या लोकसभा मतदारसंघात काय काम केले? व किती निधी आणला असा प्रति सवाल राजेश पाटील यांनी केला. तसेच गावित हे सतत ग्रामपंचायत पातळीवरचे कामाचे श्रेय चोरुन लाटताना आपल्या स्वतःच्या कतृत्वावर सपशेल अपयशी ठरल्याची टीका आमदार राजेश पाटील यांनी केली. या सभेत पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या सर्वांनी, लोकसभेचा उमेदवार अप्पांनी घोषित करावा, आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे अशी ग्वाही दिली.
 

Web Title: Lok Sabha Election 2024 : When you fight alone, you win - MLA Hitendra Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.