हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:51 PM2024-04-20T14:51:26+5:302024-04-20T14:54:32+5:30

हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले...

Sharad Pawar responsible for Harsh Vardhan Patil and NCP split; Criticism of Ajit Pawar without taking his name | हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

इंदापूर (पुणे) : मी महायुतीचा धर्म पाळणार आहे, असे जाहीर करत मागील चार लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे आमच्या वरच्यांकडे जाऊन चर्चा करायचे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, अजित पवार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अंकिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत वाघ पॅलेस येथे हा मेळावा झाला.

अजित पवार म्हणाले की, मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्याकडून काम करून घेतले जाते. नंतर मात्र वेगळे घडते असा अंकिता पाटील यांच्यासह बहुतेक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. मी शब्दाचा पक्का आहे. सन २००४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे. ते आमच्या वरच्यांकडे जायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे, असे सांगत पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्याकडे बोट दाखवले.

देशातील १३५ कोटी जनतेचा कारभार पाहू शकणारा माेदींच्या तोडीचा नेता कोणत्याही राजकीय पक्षात नाही. राहुल गांधींची काय तुलना होऊ शकते?, काय राहुल गांधींची कारकीर्द आहे? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. गेल्या दहा वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, त्याची आपण शहानिशा करावी. महायुतीचा उमेदवार निवडून आला, तर विकासाकरिता केंद्राचा जास्तीचा व राज्याचा पैसा आणायला आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, एकत्र येण्याचा योग दीर्घ कालावधीनंतर का आला, याचीही चर्चा करावी लागेल. ही राजकीय लढाई होती. महायुतीत स्वाभिमानी मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असेल, तसाच आमचा स्वभाव दिलेला शब्द पाळण्याचा आहे. त्यामुळे बारामतीत मताधिक्य जास्त मिळते की, इंदापुरात ते पाहू या, असे सांगत मनामध्ये असलेल्या आकड्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. अंकिता पाटील-ठाकरे, सुनेत्रा पवार निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले.

‘बटण दाबा कचकच’ या विधानाने वादाचा मुद्दा ठरल्यानंतर ते ग्रामीण भागातील भाषण होते, असे सांगत अजित पवार यांनी पुण्यात भाषण झाले असते, तर कसे असते याचीही नक्कल करून दाखवली. निधीबाबत बोलल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची चर्चा होत आहे, तर मग बाकीचे काहीही सांगतात आम्ही तुमच्या खात्यावर दरवर्षी अमूक इतके लाख टाकणार, आम्ही असे करणार, तसे करणार, त्यावेळी आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

Web Title: Sharad Pawar responsible for Harsh Vardhan Patil and NCP split; Criticism of Ajit Pawar without taking his name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.