खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

By admin | Published: December 6, 2015 02:30 AM2015-12-06T02:30:34+5:302015-12-06T02:30:34+5:30

भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..?

'Loop of Education' for dungeon children | खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

खाणकामगारांच्या भटक्या मुलांना शिक्षणाचे ‘वळण’

Next

- प्रवीण गायकवाड,  शिरूर (पुणे)
भटकंती आणि स्थलांतर हे कामाच्या निमित्ताने जगण्याशीच बांधलेलं... पण निदान आपली नातवंडं आणि त्यांच्यासारखीच खाणकामगारांची मुलं शिक्षणाशी जोडता आली तर..? या विचाराने ६५ वर्षांचा ‘तरुण’ नव्या उभारीने जागा झाला आणि प्रयत्नांची मोट बांधली. त्यांच्या प्रयत्नांतूनच कर्डेलवाडीच्या शाळेमध्ये आता खाणकामगारांची २३ मुले नियमित शिक्षण घेऊ लागली आहेत.
सुभाष कुसाळकर हे ६५ वर्षांचे खाणकामगार गेल्या १२ वर्षांपासून कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे रघुनाथ कर्डिले यांच्या दगडखाणीवर काम करतात. कुसाळकरांच्या पाहण्यात कर्डेलवाडी जिल्हा परिषद शाळा आली. आपण शिकलो नाही; मात्र आपली नातवंडे, समाजाची इतर मुले शिकली तर पुढची पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येईल, असे कुसाळकर यांना जाणवले.
खाणमालक कर्डिले यांनीही कुसाळकरांच्या इच्छेला वाट करून दिली. यामुळे कुसाळकर यांनी नाशिक व बुलढाणा येथे असलेल्या आपल्या कुटुंबाला कर्डेलवाडी येथे बोलावून घेतले. भटकंतीचा नाद सोडून मुलांसाठी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतर खाणकामगारांनीही हाच मार्ग अवलंबला. आता या २३ मुलांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. तीन महिन्यांतच त्यांच्यात झालेला बदल वाखाणण्याजोगा आहे. शिक्षणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

अन् मुलं लिहू-वाचू लागली!
शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका बेबीनंदा सकट या दाम्पत्याने मोठ्या आनंदाने या मुलांना शाळेत प्रवेश दिला. तीन मुले दुसरीत आहेत, तर इतर पहिल्या इयत्तेत शिक्षण घेताहेत.
तीन महिन्यांतच या मुलांना लिहिता-वाचता येऊ लागले असून, त्यांचे अक्षरही वळणदार होऊ लागले आहे. एक दिवसही ते शाळेला दांडी मारत नाहीत.

Web Title: 'Loop of Education' for dungeon children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.