औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 02:39 PM2024-04-12T14:39:58+5:302024-04-12T14:41:14+5:30

वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका

Sun's wrath on Aurad Shahjani area; Temperature 44 degrees, 11 deaths in eleven days | औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

औराद शहाजानी परिसरावर सूर्याचा कोप; तापमान ४४ अंशावर, अकरा दिवसांत ११ जणांचा मृत्यू

- बालाजी थेटे
औराद शहाजानी (जि. लातूर) :
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ- उतार होत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण निर्माण होऊन अवकाळी पाऊस झाल्याने हवेत आर्द्रता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे शरीरातील तापमान सहन करण्याची शक्ती कोलमडत आहे. परिणामी, १ ते ११ एप्रिल या कालावधीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मार्चपासून ऊन वाढले आहे. शेवटच्या आठवड्यात ४० अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान पोहोचले होते. २८ मार्च रोजी ४१ अंश सेल्सिअस, अशी येथील हवामान केंद्रावर नोंद झाली. १ ते ३ एप्रिल या कालावधीत ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असे कमाल तापमान राहिले. त्यानंतर ४, ५, ६ एप्रिल रोजी कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. दरम्यान, मंगळवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्यास सुरुवात झाली. हलका पाऊस झाल्याने आर्द्रता वाढली. १० एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले. एकंदरीत, औराद परिसरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची आतापर्यंतची पहिलीच नोंद आहे.

तापमानातील बदलाचा आरोग्यावर परिणाम
कमाल तापमानात झपाट्याने बदल होत आहे. परिणामी, १ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत परिसरातील ११ ज्येष्ठ नागरिक दगावले आहेत. त्यात विठ्ठल लक्ष्मण शिंगे (९०, रा. माने जवळगा), सोपान यादव गाडे (९२), शेषाबाई शिवराज ऐनापुरे (६०), त्र्यंबकप्पा खंडाळे (७५), कल्याणी महादाप्पा पंचाक्षरी (१०१), रत्नाबाई शंकर गायकवाड (९०), सुभद्राबाई निवृत्ती गायकवाड (७५) (सर्व जण रा. औराद शहाजानी), गंगाबाई मोहनराव मुळजे (७५), शिवाजी दिगंबर डावरगावे (५२), काशीनाथ संतराम बिरादार (७२), रुक्मिणबाई गोविंद शिंगे (८५) (रा. तगरखेडा) यांचा समावेश आहे.

४३ अंश सेल्सिअसपर्यंत सहनशक्ती
शरीराची तापमान सहनशीलता ४३ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास ते शरीरास सहन होत नाही. तेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत जाते आणि अशक्त व्यक्तींना अधिक त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी सातत्याने पाणी प्यावे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान शेतकऱ्यांनी कामे करू नयेत. सावलीचा आधार घ्यावा. डोक्यास पांढरा गमजा वापरावा.
-डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी

तापमान वाढल्याने शरीरातील पाणी कमी
तापमान अचानकपणे कमी- जास्त झाल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊन मृत्यूही ओढवू शकतो.
-डॉ. सुनील पोतदार, वैद्यकीय अधिकारी

Web Title: Sun's wrath on Aurad Shahjani area; Temperature 44 degrees, 11 deaths in eleven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.