लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती!

By हरी मोकाशे | Published: April 13, 2024 05:14 PM2024-04-13T17:14:38+5:302024-04-13T17:14:58+5:30

यंत्रसामग्रीची उपलब्धता : हृदयरोग रुग्णांना मिळणार संजीवनी

Latur's superspecialty to launch cathlab for heart patients soon! | लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती!

लातूरच्या सुपरस्पेशालिटीमध्ये लवकरच हृदयरुग्णांसाठी कॅथलॅब निर्मिती!

लातूर : गेल्या पाच-सहा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अतिविशेष उपचार केव्हापासून सुरू मिळणार आणि पदरमोड कधी थांबणार, याकडे रुग्ण व नातेवाइकांचे डोळे लागून आहेत. दरम्यान, येथे कॅथलॅबची निर्मिती करून रुग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठीच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी हृदयरोगतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सेवेमुळे हृदयरुग्णांना संजीवनी मिळणार आहे.

शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे ७०० खाटांचे आहे. आधुनिक यंत्रसामग्री आणि दर्जेदार आरोग्य सेवेमुळे जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश या सीमावर्ती भागातील रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे दररोज सकाळी रुग्णांचा मेळाच भरल्याचे पाहावयास मिळते. दरम्यान, लातुरातच दुर्धर, गंभीर रुग्णांना तत्काळ आणि मोफत उपचार मिळावेत म्हणून केंद्र शासनामार्फत अतिविशेष उपचार रुग्णालय मंजूर करण्यात आले. जवळपास पाच-सहा वर्षांपूर्वी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणीही करण्यात आली; मात्र अद्यापही हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले नाही.

चार मजली भव्य इमारत...
कोट्यवधींचा खर्च करून सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची चार मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. तेथून हृदयरोग, मेंदूविकार, किडनी विकार व प्लास्टिक सर्जरीची अतिविशेष उपचार सेवा देण्याचे नियोजित आहे; मात्र अद्यापही सेवा-सुविधा सुरू झाली नाही. त्यामुळे हे हॉस्पिटल केव्हा सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

केंद्राकडून ९० टक्के यंत्रसामग्री उपलब्ध...
हृदयरोगाशी संबंधित तपासण्या, चाचण्या करण्यासाठीची ९० टक्के यंत्रसामग्री केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येऊन ती बसविण्यात आली आहे. उर्वरित साहित्य खरेदीची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती...
पहिल्या टप्प्यात कॅथलॅब त्याचबरोबर मेंदूविकार विभाग सुरू करण्याच्या हलचाली आहेत. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉर्डियाेलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष कवठाळे आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयातील पाच परिचारिकांना एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. टेक्निशियनचीही नियुक्ती केली जाणार आहे.

कॅथलॅब सुरू करण्याचा प्रयत्न...
सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काॅर्डियोलॉजी आणि न्यूरो सर्जरी विभाग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शासनाकडून यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिचारिकांना प्रशिक्षणासाठी मुंबईला पाठविण्यात आले आहे.
- डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.

गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना लाभ होणार...
सुपरस्पेशालिटीत दोन विभाग सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कोट्यवधींची यंत्रसामग्री उपलब्ध असून त्याची प्रत्यक्ष तपासणीही करण्यात आली आहे. कॉर्डियोलॉजी विभाग सुरू झाल्यानंतर हृदयरुग्णांना वेळेवर अतिविशेष सेवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणार आहे.
- डॉ. सुनील होळीकर, विशेष कार्य अधिकारी, सुपरस्पेशालिटी.

Web Title: Latur's superspecialty to launch cathlab for heart patients soon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.