१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:53 AM2024-04-15T11:53:02+5:302024-04-15T11:53:46+5:30

मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले.

14 years of exile ended Finally Dashrath returned home | १४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

१४ वर्षांचा वनवास संपला; अखेर दशरथ स्वगृही परतले!

लोकमत न्यूज नेटवर्क, लातूर : मनःस्थिती बरी नसल्याने १४ वर्षांपूर्वी घरापासून दुरावलेले दशरथ अखेर स्वगृही परतले. ही कहाणी आहे सिंधुदुर्ग ते लातूर प्रवासाची. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि बहिणीच्या मायेने दशरथ यांना घर गाठता आले. गेल्या वर्षी २१ मे २०२३ रोजी लातूर शहरातील औसा रोड लगत छत्रपती चौक भागात एक व्यक्ती असून ती नालीचे पाणी पीत आहे, काहीही कचऱ्यातले जेवण करत आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांना मिळाली होती.

त्यानंतर रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून राहुल पाटील, असिफ पठाण, गोपाळ ओझा, मुस्तफा सय्यद, आकाश गायकवाड यांनी त्या मनःस्थिती बरी नसलेल्या व्यक्तीला चिखली (जि. बुलडाणा) येथील दिव्य सेवा संकल्पच्या अशोक काकडे यांच्याकडे उपचारासाठी पाठविले. रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दशरथ यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. त्यांचे मूळ गाव कानेड (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) आहे. दशरथ हे अविवाहित आहेत. त्यांचे आई-वडील हयात नाहीत. मात्र, मोठ्या बहिणीने त्याचा सांभाळ करायचे ठरवले असून कुटुंबियांनी संस्थेचे आभार मानत आनंद व्यक्त केला. 

अनेकांना मिळाला दिलासा...
रिलीजन टू रिस्पॉन्सबिलिटी फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी अनेकांना दिलासा मिळाला आहे. मनःस्थिती बरी नसल्याने काही जण कुटुंबापासून दुरावतात. त्यांना कोणी जवळ करत नाही. घरच्यांनीही थकून शोध घेणे सोडलेले असते. पुलाखाली, तर कधी निवारा नसताना ते अमानवीय अवस्थेत आढळतात. त्यांना बरे करून कुटुंबाकडे सुपूर्द करणे शक्य असते, जे की कार्यकर्ते करत आहेत.

Web Title: 14 years of exile ended Finally Dashrath returned home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर