ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

By अजित मांडके | Published: May 6, 2024 08:52 PM2024-05-06T20:52:11+5:302024-05-06T20:52:26+5:30

नागरिकांनीही दक्षता घ्यावी

Prohibition of vehicle washing and other cleaning activities in service center in Thane Municipal area | ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे करण्यास मनाई

ठाणे : सध्या तीव्र उन्हाळा सुरू असल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, गावे यांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचबरोबर, ठाणे महापालिका क्षेत्रातील विहिरी आणि कूप नलिका यांच्यातील पाण्याची पातळीही वेगाने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाणी बचतीची आवश्यकता आहे. म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व सर्व्हिस सेंटरमधील वाहने धुणे, पाण्याने साफसफाई करणे यास मनाई करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात, १० जून२०२४ पर्यंत दूचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहने, मोठी वाहने धुणे, तसेच पाण्याने साफसफाई करणे या कामांवर पालिकेने  निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व्हिस सेंटरवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलमांनुसार दंडात्मक कारवाई केली जाईल, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनीही दक्षता घ्यावी
त्याचबरोबर, नागरिकांनीही पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणी बचत करावी, असे आवाहन महापालिकेने केले. शक्यतो दररोज गाड्या धुतल्या जावू नयेत. त्याएेवजी बोअरवेलच्या पाण्याने ओल्या केलेल्या कपड्याने गाड्या पुसाव्यात, अशी सूचना महापालिकेने नागरिकांना केली आहे.
        
पाणी जपून वापरण्यासाठी काही उपाय
अंगणात पाणी मारू नये. नळ सुरू ठेऊन कपडे धुणे, भांडी घासणे, दात घासणे, दाढी करणे टाळावे.  घरातील नळांची गळती तातडीने दुरुस्त करावी.  सोसायटीतील गळकी टाकी, पाईप, व्हॉल्व्ह दुरुस्त करावेत. इमारतींच्या छतावरील टाकी ओव्हरफ्लो होवू नये याची दक्षता घ्यावी. त्यासंदर्भात, तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा अशी गळती आढळल्यास संबंधीत इमारतीचे-सोसायटीचे नळ कनेक्शन खंडीत करण्यात येईल. आंघोळीसाठी शॉवर व बाथटबचा वापर करू नये.  स्वच्छतागृहामध्ये डुअल फ्लशचा वापर करावा.  इमारतीतील जिने धुण्यासाठी

पिण्याचे पाणी वापरू नये.  
पाण्याचा अनावश्यक साठा करू नये तसेच, साठा केलेले पाणी रोज सकाळी ओतून देण्याची सवय बंद करावी. इमारती / सोसायटी / संकुलांमधील तरण तलावासाठी पिण्याचे पाणी वापरू नये व वारंवार पाणी बदलण्यात येऊ नये. शक्यतो आठवड्यातील पाच दिवस धुण्यायोग्य सगळे कपडे एकत्र करुन एकाच दिवशी धुवावेत. इतर दिवशी गरज पडल्यास दररोज लागणारे छोटे कपडे हाताने कमी पाण्यात धुवावेत.  

कपडे धुण्याचे मशीन आठवड्यातून एकदा किंवा अगदी आवश्यक असेल तेव्हा दोनदाच आणि ते पूर्ण क्षमतेने वापरावे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल आणि मशीनचा वापर पूर्ण क्षमतेने होईल. कपडे धुण्याचे मशीन किंवा हाताने कपडे धुवून निर्माण होणारे निरुपयोगी पाणी साठवण करुन पुढचे २ दिवस फ्लशसाठी, बाथरुम धुण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी तसेच बगीच्यासाठी वापरावे.पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा अत्यल्प असल्याने एक जबाबदार नागरिक म्हणून पाण्याचा अपव्यय टाळूया. पाणी वाचवूया आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना एकत्रितपणे करूया, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: Prohibition of vehicle washing and other cleaning activities in service center in Thane Municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.