कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार, फक्त महाराष्ट्राचा नागरिक हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 06:40 PM2020-07-16T18:40:23+5:302020-07-16T18:40:51+5:30

गेल्या आठवड्यात पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढले.

Free treatment in private hospitals for Corona patients, only a citizen of Maharashtra | कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार, फक्त महाराष्ट्राचा नागरिक हवा

कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार, फक्त महाराष्ट्राचा नागरिक हवा

googlenewsNext
ठळक मुद्दे गेल्या आठवड्यात पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढले.

उल्हासनगर : शहरातील खासगी रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत कोरोना रुग्णाची मोफत उपचार होणार आहे. तसा आदेश महापालिका आयुक्तांनी काढला असूंन त्यासाठी रुग्ण महाराष्ट्राचा नागरिक असावा, अशी अट घालण्यात आली आहे. उल्हासनगरात कोरोना रुग्णाने ५ हजाराचा टप्पा पार केला असून उपचारा विना रुग्णाचे हाल होत आहे. तसेच शहरातील मृत्यूचा दर गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट झाल्याची ओरड होत असून राजकीय पक्ष एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत आहेत.

गेल्या आठवड्यात पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढले. प्रत्यक्षात आदेश खाजगी रुग्णालय केराच्या टोपलीत टाकत असल्याची टीका होत आहे. बुधवारी महापालिका जनसंपर्क अधिकाऱ्याने प्रसिद्धी पत्रक काढून शहरातील खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णावर महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार होणार असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी रुग्ण महाराष्ट्रचा नागरिक असण्याची अट घालण्यात आली आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णाला उपचारासाठी भरती करतेवेळी, शिधावाटप पत्रिका कोणत्याही रंगाची, आधारकार्ड, महाराष्ट्राचा नागरिक असल्याचे कोणतेही ओळखपत्र द्यावे लागणार आहे. 

आयुक्तांच्या आदेशाने रुग्णाची आर्थिक पिळवणूक थांबणार असून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रुग्णालयातील सर्वसामान्य खाटसाठी ४ हजार, अतिदक्षता विभागातील खाट साठी ७ हजार तर व्हेंटिलेटर खाट साठी ९ हजार प्रतिदिन बील आकारावे, असे दरही शासनाने रुग्णालयाला ठरवून दिले. ३१ जुलैपर्यंत सदर योजना सुरू राहणार असून त्यानंतर शासन निर्णय घेणार आहे. प्रत्यक्षात खासगी रुग्णालय कोरोना रुग्णावर उपचार करणार का? ८० टक्के बेड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शासन निर्णयाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले. तसेच रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी भरारी पथक महापालिकेने स्थापन केले आहे. 

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

शहरातील कोणत्याही खाजगी रुग्णालयात मोफत जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी राज्यातील नागरिक असल्याची अट घालण्यात आली असून कोरोना बाबतची भीती जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे.
 

Web Title: Free treatment in private hospitals for Corona patients, only a citizen of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.