माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 01:08 PM2024-04-26T13:08:40+5:302024-04-26T13:11:47+5:30

Narayan Patil : नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

set back for mahayuti in Madha lok sabha Former Karmala MLA Narayan Patil joins sharad Pawars NCP | माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

माढ्यात महायुतीला धक्के सुरूच; करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Madha Lok Sabha ( Marathi News ) :माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. मोहिते पाटील कुटुंबाने भाजपविरोधात बंड करत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पवार यांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मोहिते पाटलांचा विजय सुकर व्हावा यासाठी पवारांकडून नवनवे डावपेच आखले जात आहेत. लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अभयसिंह जगताप आणि शेकापचे अनिकेत देशमुख यांचं बंड थंड केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे करमाळ्यातील माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याकडे खेचण्यात शरद पवारांना यश मिळालं आहे. नारायण पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश सोहळ्यावेळीही नारायण पाटील उपस्थित होते. त्यामुळे तेही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं सांगितलं जात होतं. अखेर या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झालं असून पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात काय आहे राजकीय स्थिती?

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ठिकाणी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील तसेच वंचितचे रमेश बारसकर यांच्या थेट लढत होणार आहे. यांच्यासोबत आणखी २९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माढ्यातील उमेदवारांमध्ये सातारा जिल्ह्यातील १० जणांचा समावेश आहे. राजकीय पक्षाकडून चौघे जण, तर अपक्ष म्हणून ६ जण रिंगणात आहेत. उर्वरित २२ उमेदवार सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा आणि सांगोला तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे माढ्याच्या निवडणूक मैदानात सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करतात. आताही या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील उमेदवार आहेत. या निवडणुकीचे राजकीय चित्र सोमवारी स्पष्ट झाले. त्यानुसार यावर्षी रणांगणात ३२ जण राहिले आहेत.

सातारा जिल्ह्यातील १० जण माढा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा समोवश आहे. त्याचबरोबर बसपाकडून स्वरूपकुमार जानकर, स्वराज्य सेना (महाराष्ट्र) कडून सत्यवान ओंबासे तर रिपाइं (ए) च्या वतीने संतोष बिचुकले निवडणूक लढवत आहेत

Web Title: set back for mahayuti in Madha lok sabha Former Karmala MLA Narayan Patil joins sharad Pawars NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.