विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 07:32 PM2021-05-13T19:32:41+5:302021-05-13T19:33:22+5:30

सिंधुदुर्ग पोलिसांच्या सर्तकतेचं कौतुक; ऑनलाईन पास आल्यानंतर पृथ्वी शॉ गोव्याला मार्गस्थ

cricketer prithvi shaw stopped in mumbai by police for travelling without e pass | विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलं

विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वी शॉला आंबोलीत रोखलं; पास आल्यानंतर तासाभरानं सोडलं

googlenewsNext

- अनंत जाधव 

सावंतवाडी: संपूर्ण राज्यात कडक लॉकडाउन असताना भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा विनापास मुंबईहून गोव्याकडे कोल्हापूर मार्गे चालला होता. मात्र त्याला आंबोली येथे पोलिसांनी रोखले. आधी पास दाखव आणि नंतर पुढे जा असे पोलिसांनी सांगितल्याने पृथ्वीचा एकच गोंधळ उडाला. अखेर ऑनलाईन पास काढून पृथ्वी गोव्याकडे मार्गस्थ झाला. मुंबईहून प्रवास करताना पृथ्वीला कुठेही पास विचारण्यात आला नाही. मात्र आंबोली पोलिसांच्या जागरूकतेमुळे एका सेलिब्रिटी क्रिकेटरला एक तास थांबून राहावे लागले. पोलिसांच्या या सतर्कतेचे सध्या परिसरात कौतुक होत आहे.

VIDEO: प्रेमविवाहाच्या वादातून दिवसाढवळ्या तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या; परिसरात खळबळ

भारताचा युवा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा मित्रासोबत मुंबईहून कोल्हापूरमार्गे गोव्याकडे जाण्यास निघाला होता. त्याची कार बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आंबोली पोलीस दुरक्षेत्राजवळ आली असता आरोग्य विभागाने त्यांची आरोग्य तपासणी केली त्यानंतर पोलिसांनी पासबाबत विचारले, तेव्हा तो थोडा गडबडला. त्याने पास नसल्याचे सांगितले. पास शिवाय जाता येणार नाही असे सांगत पोलिसांनी त्याला तिथेच रोखले. त्याने पोलिसांना विनंतीही केली. पण पोलीस आपल्या कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. पोलीस आपणास सोडणार नाही हे ओळखून पृथ्वीने  तिथूनच ऑनलाईन पाससाठी अर्ज केला. त्यानंतर एक तासाने त्याचा पास तयार होऊन त्याच्या मोबाईलवर आला. तो पास पोलिसांना दाखवून पुढे गोव्याकडे मार्गस्थ झाला.

पुणे - मुंबई धावणारी 'डेक्कन क्वीन' उद्यापासून रद्द! प्रवाशांची तीव्र नाराजी

या घटनेमुळे गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये मुंबई येथील उद्योजक वाधवान बंधू हे मुंबईवरून महाबळेश्वर येथे विनापास फिरायला गेले होते याची अनेकांना आठवण झाली. त्या प्रकरणावरून राज्यात खळबळ उडाली होती. ज्या पोलीस अधिकाऱ्याने वाधवान बंधूंना परवानगी दिली होती, तो अधिकारीही नंतर चौकशीच्या फेऱ्यात सापडला होता. मात्र येथे आंबोली पोलिसांनी सर्तकता दाखवत पृथ्वी शॉ याला पुढील प्रवास विनापास करण्यापासून रोखले व पास काढण्यास भाग पाडले. मात्र मुंबईहून आंबोलीपर्यंत कोणीही त्याची कार कशी थांबवली नाही, याबद्दलच आश्चर्य व्यक्त होत आहे. 

या सर्व गडबडीत पृथ्वीचा एक तास वाया गेला. या वेळात त्याने काही काळ गाडीतच बसणे पसंत केले. पृथ्वी शॉ आंबोलीत एक तास होता, ही बातमी उशिरा समजल्याने अनेकांचा हिरमोड झाला. अन्यथा त्याला बघण्यासाठी मोठी गर्दी झाली असती. पृथ्वी हा दिल्लीकडून आयपीएल खेळत असून सध्या आयपीएलवर कोरोनाचे सावट असल्याने स्पर्धा थांबवण्यात आली आहे. त्यामुळे तो गोव्याला मित्रासोबत फिरायला गेल्याचे सांगण्यात येत आहे.

आमच्यासाठी कायदा महत्वाचा :जाधव
पृथ्वी शॉ याला पास नसल्याने रोखणारे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्यासाठी कायदा महत्वाचा आहे. कायदा रस्त्यावरील प्रत्येक माणसासाठी सारखाच आहे. सेलिब्रेटीला वेगळा नियम आणि सामान्य माणसाला वेगळा नियम असू शकत नाही. त्यामुळेच विनापास प्रवास करणाऱ्या पृथ्वीला रोखले.

Web Title: cricketer prithvi shaw stopped in mumbai by police for travelling without e pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.