Sindhudurg: जानवली येथील अपघाताचा सखोल तपास करावा, ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 12:35 PM2024-04-22T12:35:20+5:302024-04-22T12:36:20+5:30

..अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

A thorough investigation of the accident in Janwali, villagers demand from the police | Sindhudurg: जानवली येथील अपघाताचा सखोल तपास करावा, ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

Sindhudurg: जानवली येथील अपघाताचा सखोल तपास करावा, ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी

कणकवली: मुंबई-गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय-लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. त्या दोघांना धडक देणाऱ्या वाहन चालकावर ३०४ कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अ‍ॅड. सुदीप कांबळे व जानवली, बौद्धवाडी येथील ग्रामस्थानी केली आहे. 

कणकवली पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करताना अ‍ॅड. कांबळे यांनी योग्य ती कार्यवाही न झाल्यास गुरुवारी २५ एप्रिलला कणकवली पोलिस ठाण्यावर मोर्चा काढू, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करून संबंधित दोषीवर कायदेशीर कारवाई करू, असे आश्‍वासन सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिले. या अपघात प्रकरणाबाबत २२ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार असल्याचे  कांबळे यांनी  यावेळी सांगितले.

जाधव माय-लेकाच्या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, जानवली सरपंच अजित पवार, भाई जाधव, मंगेश पवार, बाळा डांगमोडेकर, नागेश पवार, दिपा पवार, सुनिता पवार, प्रतिभा जाधव, सुनिता डागमोडेकर, डॉ. राहुल पवार, प्रियांका पवार, क्रांती पवार, मेघा पवार, श्रद्धा तळवडेकर, प्रज्ञा तळवडेकर यांच्यासह जाधव यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक शरद देठे  उपस्थित होते.

मंगला जाधव यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कारसह पसार झालेल्या चालकास फोंडाघाट तपासणी नाका येथे कार्यरत पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. या अपघातप्रकरणी अ‍ॅड. सुदीप कांबळे यांनी मनोज पाटील व शरद देठे यांच्याशी चर्चा केली. अ‍ॅड. कांबळे म्हणाले, मंगला जाधव या गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. हा खर्च करताना जाधव कुटुंबियांची दमछाक होत आहे.

अपघातानंतर पोलिसांनी स्पॉट पंचनामा केला नाही. चालकाला अभय मिळेल, अशी कलमे गुन्हा दाखल करताना लावण्यात आली आहेत. अपघातापासून आजपर्यंत शरदचंद्र जाधव याच्या आईचा जबाब पोलिसांनी घेतलेला नाही.  कार चालक तोच होता का?, अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज का घेण्यात आले नाही, असे सवाल अ‍ॅड. कांबळे व जाधव यांच्या कुटुंबियांनी पोलिस अधिकाऱ्यांना केले.

Web Title: A thorough investigation of the accident in Janwali, villagers demand from the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.