प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात

By दीपक शिंदे | Published: April 24, 2024 11:05 PM2024-04-24T23:05:53+5:302024-04-24T23:06:00+5:30

सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मेढा, मानकुमरे पॉइंट (ता. जावली) येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

i foiled the plot to swallow up the pratapgarh factory udayanraje criticize shashikant shinde | प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात

प्रतापगड कारखाना गिळंकृत करण्याचे षडयंत्र मी हाणून पाडले; उदयनराजेंचा शशिकांत शिंदे यांच्यावर घणाघात

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, मेढा : माझ्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवाराने सत्तेवर असताना प्रतापगड साखर कारखाना गिळंकृत करण्याचे षड्यंत्र रचले होते. मी योग्य वेळी ते हाणून पाडले, म्हणून हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला आहे, असा घणाघात महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मेढा, मानकुमरे पॉइंट (ता. जावली) येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. आमदार शिवेंद्रराजे भोसले, वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँक संचालक ज्ञानेश्वर रांजणे, सुनील काटकर, सौरभ शिंदे, जयदीप शिंदे, सयाजीराव शिंदे, शिवाजीराव मर्ढेकर, लक्ष्मणराव कडव, एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, गीताताई लोखंडे, कविता धनावडे, निर्मलाताई दुधाणे, कांतीबाई देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, जावळी तालुक्यातील प्रतापगड कारखाना अडचणीत आला होता. त्यावेळी तत्कालीन आमदाराने गिळंकृत करण्याचा विचार सुरू केला होता. तत्कालीन अध्यक्षा सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे यांनी वस्तुस्थिती मला सांगून कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिला पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर आम्ही प्रयत्न करून कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात ठेवला.

दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर माथाडी युनियनचे नेतृत्व संबंधिताने ताब्यात घेतले. त्या ठिकाणीही गैरव्यवहार केला. मुंबई बाजार समितीच्या घोटाळ्याप्रकरणी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. काँग्रेसच्या सत्तेच्या काळात घोटाळे करणाऱ्यांची इतकी सवय लोकांना लागली कि, लोकांची नजरच मेली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यानंतर घोटाळेबाजांना चाप बसला.

विरोधातील उमेदवार चिमटा काढण्यात पटाईत

माझ्या विरोधात उमेदवाराने आमदारकीच्या काळात विकास करण्याऐवजी भूलथापा मारून लोकांचा विश्वासघात केला. हा माणूस चिमटा काढण्यात पटाईत आहे. जनतेने सावध व्हावे. अशा लोकांना काड्या लावायला भरपूर वेळ असतो. आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर डोंगर आहे. अशा काड्या लावणाऱ्यांपासून सावध राहिलो नाही तर अधोगतीचा वणवा पेटून प्रगती खुंटेल, अशी टीकाही उदयनराजेंनी केली.

प्रदेशाध्यक्षांचे ज्ञान अपुरे

विरोधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी माझ्यामुळे काही लोकांना वारस नोंदीला अडचण येतात, असे म्हटले होते. त्यांचे ज्ञान अपुरे आहे. मी कधी कुणाच्या आडवे गेलो नाही. कुणाच्या नोंदी नियमानुसार घालायच्या असतील तर आपण बसून करू, असेही उदयनराजे म्हणाले.

Web Title: i foiled the plot to swallow up the pratapgarh factory udayanraje criticize shashikant shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.