Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

By नितीन काळेल | Published: March 28, 2024 07:32 PM2024-03-28T19:32:16+5:302024-03-28T19:32:33+5:30

सातारा : महायुतीतील सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून मतदारसंघ भाजपला देण्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. या बदल्यात अजित पवार ...

BJP will get Satara Lok Sabha constituency, In return, Ajit Pawar's group is likely to get one seat in the Rajya Sabha | Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

Lok sabha 2024: सातारा भाजपच्या पारड्यात! बदल्यात अजित पवार गटाला मिळणार..

सातारा : महायुतीतील सातारा लोकसभेचा तिढा सुटला असून मतदारसंघ भाजपला देण्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. या बदल्यात अजित पवार गटाला राज्यसभेत एका जागेचे प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळत आहे. त्यामुळे महायुतीतील साताऱ्याचा उमेदवार उदयनराजे हेच असणार हे स्पष्ट होत आहे.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच सातारा मतदारसंघ चर्चेत आला आहे. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत मतदारसंघाचा ताबा कोण घेणार यावरुन राजकारण रंगले. आता निवडणूक जाहीर होऊन १५ दिवस होत आहेत. तरीही महायुतीत मतदारसंघ कोणाकडे जाणार हे जाहीर झालेले नाही. मात्र, युतीत मतदारसंघ शिवसेनेकडे असलातरी भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटातच खरी रस्सीखेच सुरू होती. अजित पवार गट कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ देण्यास आजही तयारी नाही. यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अनेकवेळा गाऱ्हाणे गायले आहे. 

तसेच बुधवारीच पुण्यात पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांच्याबराेबर बैठक झाली. यावेळीही सातारा मतदारसंघ सोडू नका, असे नेत्यांनी आर्जव केले. कारण, येत्या काही महिन्यात विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकांची निवडणूक आहेत. त्यामुळे पक्षाला आणखी ताकद मिळण्यासाठी सातारा लोकसभेची निवडणूक लढवावी, असा आग्रह धरण्यात आला होता. पण, याच बैठकीत सातारा मतदारसंघ भाजपला सोडला तर आपल्याला एक राज्यसभेची जागा मिळणार असल्याचेही संकेत देण्यात आले. त्यामुळे सातारा मतदारसंघ भाजपसाठी सोडणार असल्याचे जवळपास स्पष्ट होत आहे. असे झालेतर साताऱ्यातून महायुतीचा उमेदवार हे खासदार उदयनराजे भोसले हेच असणार आहेत.

सातारा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी सुरुवातीला भाजपचे वरिष्ठ अनुकूल नव्हते, अशी माहिती सध्या प्राप्त होऊ लागली आहे. मात्र, खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजीतून आपली दखल घ्यायला लावली. तसेच खासदार उदयनराजे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते दिल्लीला गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते सातारला चार दिवसानंतर आले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावरुनच उदयनराजे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे महायुतीत मतदारसंघ भाजपकडे राहण्याचेच संकेत आहेत.

उदयनराजेंनी १५ दिवसांपूर्वीच निवडणुकीचे संकेत दिलेले..

लोकसभा निवडणुकीबाबत उदयनराजे यांनी गेल्या वर्षभरात कधीच वक्तव्य केले नाही. पत्रकारांनी खोदून विचारल्यावरही त्यांनी स्पष्ट संकेत दिले नव्हते. मात्र, लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या दिवशी साताऱ्यात विकासकामांचे उद्घघाटन झाले. या कार्यक्रमाला उदयनराजे उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी माझ्याकडे बस, रेल्वेचे तिकीट आहे. तसेच मी राजकीय संन्यास घेणार नाही, असेही ठणकावून सांगितले होते. त्यामुळे त्यावेळीच त्यांची दिशा काय असणार हे समोर आले होते. त्यातच मागील १५ दिवसांतील इतर काही घडामोडी पाहता उदयनराजे हे सातारा लोकसभा मतदारसंघ निवडणूक कसेही आणि कोणत्याही परिस्थितीत लढविणार, हेही स्पष्ट होत आहे.

Web Title: BJP will get Satara Lok Sabha constituency, In return, Ajit Pawar's group is likely to get one seat in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.