मृत्यू झाल्यानंतर दीड महिन्यांनी मिळाले प्रमाणपत्र

By अविनाश कोळी | Published: April 23, 2024 09:24 PM2024-04-23T21:24:11+5:302024-04-23T21:25:15+5:30

महापालिकेचा कारभार : निवडणूक कामामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम

The certificate was received after one and a half months after the death | मृत्यू झाल्यानंतर दीड महिन्यांनी मिळाले प्रमाणपत्र

मृत्यू झाल्यानंतर दीड महिन्यांनी मिळाले प्रमाणपत्र

सांगली : शासकीय तसेच बँकिंग कामासाठी मृत्यूचा दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे तो वेळेत मिळावा म्हणून नातेवाईकांची धडपड सुरु असते. अशावेळी सांगलीतील एका कुटुंबाला मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी तब्बल दीड महिना हेलपाटे मारावे लागले. अखेर आयुक्तांकडे तक्रार गेल्यानंतर कर्मचाऱ्यांना जाग आली व त्यांनी दाखला दिला.

येथील हरिपूर रस्त्यावरील पाटणे प्लॉटमधील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू ३ मार्च २०२४ रोजी झाला होता. मृत्यू सांगलीत झाला असला तरी शवविच्छेदन मिरज येथे झाले होते. त्यामुळे मृत्यूची नोंद मिरजेत होणे अपेक्षित होते. मृत्यूच्या नोंदीबाबत चालढकलपणा करण्यात आला. नातेवाईकांनी महापालिकेकडे अनेक हेलपाटे मारले, पण त्यांना दाखला मिळत नव्हता. ऑपरेटर नसल्याने नोंद करता येत नाही. कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, अशी उत्तरे दिली जात होती. अखेर हेलपाटे मारून थकलेल्या नातेवाईकांनी नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी याबाबतची तक्रार महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे केली. गुप्ता यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला.

आयुक्तांकडे तक्रार दाखल झाल्याचे समजताच महापालिकेच्या मिरज विभागात तातडीने हालचाली झाल्या. संबंधित नातेवाईकांना दाखला तयार असल्याचे सांगून मिरज कार्यालयात येण्याची विनंती केली. नातेवाईक आल्यानंतर त्यांच्याकडे मृत्यूचा दाखला सुपूर्द केला.
 
निवडणुकीचा दैनंदिन कामावर परिणाम

महापालिकेचे अनेक कर्मचारी निवडणुकीच्या कामावर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामावरही परिणाम दिसून येत आहे. बांधकाम परवान्यांना लागणारा विलंब, दाखल्यांच्या नोंदी, करवसुली आदी कामे दिरंगाईने होताना दिसत आहेत. नागरिकांतून याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: The certificate was received after one and a half months after the death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली