सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई

By घनशाम नवाथे | Published: April 17, 2024 06:33 PM2024-04-17T18:33:37+5:302024-04-17T18:34:42+5:30

सांगलीवाडीत तिसरी कारवाई

Cash of one and a half lakh seized in Sangliwadi, action taken by SST team at check post | सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई

सांगलीवाडीत साडे दहा लाखाची रोकड जप्त, एसएसटी पथकाकडून तपासणी नाक्यावर कारवाई

सांगली : सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत स्थिर सर्वेक्षण पथक अर्थात एसएसटी पथकाने मोटारीतून वाहतूक केली जाणारी साडे दहा लाखाची रोकड जप्त केली. मोटार चालक जोतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत.

अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापन करण्यात आले आहेत. या नाक्यावर २४ तास पोलिस व प्रशासन यांचे पथक कार्यरत असते. सांगलीवाडी येथे एसएसटी पथक क्रमांक तीनचे प्रमुख निखिल मांगोरे व आचार संहिता कक्ष प्रमुख विनायक झाडे, सहाय्यक पथक प्रमुख शंकर भंडारे, फोटोग्राफर प्रमोद अर्जुन भिसे तसेच पोलिस कर्मचारी निशांत मागाडे, विकी मोरे, वैशाली हटाळे यांचे पथक बुधवारी सांगलीवाडी टोल नाका येथे कार्यरत होते.

वाहनांची तपासणी सुरू असताना मोटार (एमएच ०९डीएम १८९९) अडवून वाहनाची झडती घेतली असता, चालक जोतिबा फुलचंद गोरे यांच्या ताब्यात १० लाख ५१ हजार २० रुपये इतकी रोकड मिळून आली. या रकमेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता रकमेबाबत कोणतीही कागदपत्र नसल्याने आढळले. रक्कम हस्तांतराबाबत निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी दाखवू शकला नाही. त्यामुळे ही रोकड दोन पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आली आहे.

चालक गोरे हा पुणे येथून आरग (ता. मिरज) येथे जात होता अशी माहिती मिळाली. निवडणूक आयोगाच्या व आयकर विभागाला या कारवाईचा अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे शहर पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

सांगलीवाडीत तिसरी कारवाई

सांगलीवाडीत ४१ किलो चांदीचे दागिने मागील आठवड्यात जप्त केले. त्यानंतर लगेचच सव्वा दोन लाखाची रोकड जप्त केली. बुधवारी दहा लाख ५१ हजाराची रोकड जप्त केली. या नाक्यावरील ही तिसरी कारवाई ठरली आहे. कारवाईबद्दल प्रशासनाकडून एसएसटी पथकाने कौतुक होत आहे.

Web Title: Cash of one and a half lakh seized in Sangliwadi, action taken by SST team at check post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.