Raigad: अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद 

By निखिल म्हात्रे | Published: May 2, 2024 02:46 PM2024-05-02T14:46:21+5:302024-05-02T14:46:36+5:30

Raigad Crime News: खालापूर तालुक्यातील दोन मंदिराची दानपेटी फोडून पळ काढलेल्या चार अट्टल चोरट्याना खोपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड, पनवेल, गोवा ते सावंतवाडी पट्ट्यात या चोरट्यांनी मदीरातील दानपेट्यांवर डल्ला मारला होता.

Raigad: Attal thieves arrested by Khopoli police | Raigad: अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद 

Raigad: अट्टल चोरट्यांना खोपोली पोलिसांनी केले जेरबंद 

- निखिल म्हात्रे
अलिबाग - खालापूर तालुक्यातील दोन मंदिराची दानपेटी फोडून पळ काढलेल्या चार अट्टल चोरट्याना खोपोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रायगड, पनवेल, गोवा ते सावंतवाडी पट्ट्यात या चोरट्यांनी मदीरातील दानपेट्यांवर डल्ला मारला होता. आतापर्यंत त्यांच्याकडून सात लाख 2 हजार 800 रुपयांची रोख रक्कम जप्त केली असल्याची माहीती जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

राजू फरत शेख, (वय-27 वर्षे, रा. आमतला, बारशात वाकडा, जि. डमडम, कलकत्ता, पश्चीम बंगाल, मुळ रा.मु.पो.पेरोली, कलिया, जि. नडाईली, बांग्लादेश), इम्रान शहीद शेख, (वय-24 वर्षे, रा. रुम नंबर 305, शक्तीनगर, उदना, सुरत, गुजरात), राकीब कुलमोहंमद शेख, (वय-28 वर्षे, सद्या रा. 90 फिट रोड नाका, नालासोपारा, मुळ रा. रुम नं.261, शास्त्रीनगर, सरत, गुजरात), मुजाहिद गुलजार खान, (वय-28 वर्षे, रा. कारेगांव, रांजणगांव, ता. शिरूर, जि. पुणे, मुळ रा.झारखंड) अशी आरोपींची नावे आहेत. इम्रान आणि राकीब हे दोघेही मुळ राहणार बांग्लादेश चे असल्याचा अंदाज असून त्यादृष्टीने तसा तपास ही सुरु आहे. चार ही आरोपी मागील चार वर्षापासून वेठ बीगारीच्या कामासाठी सीबीडी बेलापूर येथे व्यास्तव्यास असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खोपोली येथील तेज फार्म हाऊस जवळ असणाऱ्या बहिरी देव मंदिर येथे 25 एप्रिल 2024 ला रात्री आणि शीलफाटा-खोपोली येथील श्री हनुमान मंदिर येथे दिनांक 26 एप्रिल 2024 ला रात्री या चौघांनी मंदिरांचे दरवाजे तोडून मंदिरातील दानपेट्या फोडून बहिरी देव मंदिराच्या दानपेटीतून 10 हजार रुपयांची रक्कम आणि श्री. हनुमान मंदिराच्या दानपेटीमधून 8 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याच्या घटना घडलेल्या होत्या. त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात भादविसंक. 457,380 व भा.द.वि.सं.क.457,380 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

लागोपाठ मंदिर चोरीचे गुन्हे करुन अज्ञात आरोपींनी एक प्रकारे पोलीस प्रशासनास आव्हान दिले होते. या घटनांचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपासाच्या आधारे चोरी करणाऱ्या आरोपींचा मार्ग काढून खोपोली येथून पनवेल येथ पर्यंत सर्व प्रथम पाठलाग केला परंतू तत्पूर्वीच आरोपीत पनवेल येथून निसटले होते. त्यानंतर गोवा येथे पोहोचल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथक  गोवा येथे पोहोचून म्हापसा येथे आरोपींचा शोध सुरु केला. त्यावेळी तपास पथकास म्हापसा, गोवा येथे एका मोठ्या मंदिरामध्ये मोठ्या रक्कमेची चोरी झाल्याची माहिती मिळाली. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याची खात्री झाली. त्यावेळी हे आरोपीत सावंतवाडी येथे पोहोचल्याची माहिती मिळाल्याने तपास पथक तातडीने सावंतवाडी येथे पोहोचले व तेथे चारही आरोपीतांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासामध्ये आतापार्यंत एकूण 7 लाख 2 हजार 800 रुपये इतकी रोख रक्कम जप्त करण्यात आलेली असून यातील अटक आरोपी राजू फरत शेख याने त्याच्या वाट्याला आलेल्या रक्कमेपैकी 1 लाख 33 हजार रुपये इतकी रोख रक्कम नातेवाईकाच्या बांग्लादेश येथील एका बँक अकाऊंटमध्ये वर्ग केली असल्याचेही तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.

या चार आरोपींनी बहिरी देव मंदिर, खोपोली, श्री हनुमान मंदिर, शिळफाटा-खोपोली, खालापूर येथील पंचायतन मंदिर, शिरूर-पुणे येथील जैन मंदिर, टिटवाळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर व म्हापसा- गोवा येथील बोडगेश्वर मंदिर या ठिकाणच्या दानपेट्या फोडून चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. चारही अटक आरोपींची शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

Web Title: Raigad: Attal thieves arrested by Khopoli police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.