रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाचा मृत्यू; आईच्या तक्रारीवरुन मुलास अटक

By निखिल म्हात्रे | Published: March 26, 2024 09:00 PM2024-03-26T21:00:06+5:302024-03-26T21:00:53+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गणेश कुबल (26) रा. रांजणपाडा असे या आरोपी मुलाचे नाव आहे.

Father's death due to an act of anger; Child arrested on mother's complaint | रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाचा मृत्यू; आईच्या तक्रारीवरुन मुलास अटक

रागाच्या भरात केलेल्या कृत्याने बापाचा मृत्यू; आईच्या तक्रारीवरुन मुलास अटक

अलिबाग - रागाच्या भरात स्वतःच्या बापाला किरकोळ कारणावरून मारहाण केली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मुंबई येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथे घडली. याप्रकरणी आईने मुलाविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी त्याला मंगळवारी दुपारी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल गणेश कुबल (26) रा. रांजणपाडा असे या आरोपी मुलाचे नाव आहे. त्याला व्यायामशाळेत जाण्याची आवड आहे. त्याने व्यायामातून स्वतःचे शरीर सुदृढ ठेवले होते. प्रशिक्षकाव्यतिरिक्त तो काहीच नोकरी, व्यवसाय करीत नव्हता. शनिवारी (दि.23) दुपारी त्याची आई आरती कुबल यांच्याकडे जेवणासाठी त्याने मच्छिची मागणी केली. मात्र, आईने नकार दिल्याने तिच्यासोबत वाद घालून तो घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यावर त्याची आई व वडील यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरु होते. त्यामुळे त्याने रागाच्या भरात घरातील जेवणाचे टोप घराबाहेर फेकून दिले. त्यावेळी त्याच्यासोबत वडिलांशी वाद सुरु झाला. हा वाद विकोपाला गेला. त्याने वडिलांना हाताबुक्क्याने मारहाण करण्याबरोबरच त्यांच्या जोरदार कानाखाली मारली. या मारहाणीत ते लादीवर पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दुसऱ्या दिवशी त्यांना उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अधिक उपचारासाठी मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात उपचार सुुरू असताना सोमवारी (दि.25) धुळीवंदनाच्या दिवशी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूला मुलगा कारणीभूत ठरल्याचा आरोप करीत आरती कुबल यांनी कुणालविरोधात मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला असून, कुणालला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही. लांडे करीत आहेत.

वडील होते एसटीमध्ये कामाला

गणेश रामचंद्र कुबल (52) रा. रांजणपाडा असे या मृत बापाचे नाव आहे. गेली 19 वर्षे ते एसटी महामंडळमध्ये वाहक म्हणून नोकरीला होते. गैरहजर असल्याने त्यांच्याविरोधात एसटी महामंडळाने बडतर्फची कारवाई केली होती. त्यामुळे ते घरीच होते. त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते. सतत ते घरी दारू पिऊन येत होते. त्यामुळे पत्नीसोबत त्यांचे सतत भांडण होत असे

Web Title: Father's death due to an act of anger; Child arrested on mother's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.