ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:17 PM2024-05-10T14:17:43+5:302024-05-10T14:18:17+5:30

अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आज प्रथमच शरद पवार यांनी खरमरीत शब्दांचा वापर केल्याचं पाहायला मिळालं.

They speak childishly Sharad Pawars aggressive counterattack on ncp ajit pawar | ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार

Sharad Pawar PC ( Marathi News ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाने आता टोक गाठलं आहे. संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार हे काही विधाने करत असतात, असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांचं वक्तव्य बालबुद्धीचं असल्याचा हल्लाबोल शरद पवारांनी केला आहे.

अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर शरद पवार म्हणाले की, "यावर मी फार काही बोलू इच्छित नाही. मात्र राजकारणात बालबुद्धी असं वैशिष्ट्य असणारे अनेक लोक असतात. अशा बालबुद्धीतून ते बोलत असतात. त्याकडे आपण का लक्ष द्यायचं?" असा खोचक सवाल पवारांनी विचारला आहे.

दरम्यान, अजित पवार हे मागील अनेक दिवसांपासून प्रचारसभांच्या निमित्ताने शरद पवारांवर विविध आरोप करत आहेत. मात्र या आरोपांवर बोलताना आज प्रथमच शरद पवार यांनी खरमरीत शब्दांचा वापर केल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं की, "मी फार जवळून शरद पवारांसोबत काम केलं आहे. त्यांच्या कामाची पद्धत मला माहीत आहे. संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी शरद पवार अनेकदा विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील वाटत नाही. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांचा स्वभाव पाहिला आहे, ते बघता ते पक्ष विलीन करण्याचा निर्णय घेतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात, तो सामूहिक निर्णय आहे असं दाखवतात, मात्र स्वत: जे वाटतं तोच निर्णय घेतात," असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

Web Title: They speak childishly Sharad Pawars aggressive counterattack on ncp ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.