सूर्याची प्रतिमा तयार करण्यात यश! NCRA च्या संशोधकांची कामगिरी,‘मीरकॅट रेडिओ दुर्बिणी’चा वापर

By श्रीकिशन काळे | Published: April 26, 2024 01:24 PM2024-04-26T13:24:16+5:302024-04-26T13:26:58+5:30

दक्षिण आफ्रिकेच्या कारू वाळवंटात उभारलेले मीरकॅट (MeerKAT) नामक रेडिओ दूरदर्शक संकुल आगामी स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (SKAO) च्या मध्य-रेडिओ लहरी वर्णपटात निरीक्षणे करणारे रेडिओ दूरदर्शक संकुल आहे...

Success in creating an image of the sun feat by NCR researchers, using the 'Meerkat Radio Telescope' | सूर्याची प्रतिमा तयार करण्यात यश! NCRA च्या संशोधकांची कामगिरी,‘मीरकॅट रेडिओ दुर्बिणी’चा वापर

सूर्याची प्रतिमा तयार करण्यात यश! NCRA च्या संशोधकांची कामगिरी,‘मीरकॅट रेडिओ दुर्बिणी’चा वापर

पुणे : तुम्ही कधी सूर्याची प्रतिमा पाहिली आहे का? नाही ना! पण आता पाहू शकाल! नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए), पुणे येथील संशोधकांच्या नेतृत्वाखालील सौर भौतिकशास्त्रज्ञांच्या चमूने सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील मीरकॅट रेडिओ दुर्बिणीचा वापर करत सूर्याची अपवादात्मक तपशिलवार रेडिओ प्रतिमा तयार केली आहे. ज्यामुळे सूर्याची त्यांना अभूतपूर्व अचूक आणि लहान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या कारू वाळवंटात उभारलेले मीरकॅट (MeerKAT) नामक रेडिओ दूरदर्शक संकुल आगामी स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्व्हेटरी (SKAO) च्या मध्य-रेडिओ लहरी वर्णपटात निरीक्षणे करणारे रेडिओ दूरदर्शक संकुल आहे. या संकुलात आठ किलोमीटर त्रिज्येच्या परिसरात १३.५ मीटर व्यासाचे ६४ रेडिओ दूरदर्शक उभारले आहेत. हे दूरदर्शक गिगाहर्ट्झ (GHz) कंपन संख्येच्या रेडिओ लहरींवर निरीक्षणे करतात. या संशोधनातील प्रमुख वैज्ञानिक डॉ. देवज्योती कंसाबनिक म्हणतात, ‘खरंतर सूर्य हा अभ्यास करण्यासाठी, विशेषत: रेडिओ तरंगलांबीवर आश्चर्यकारकपणे आव्हानात्मक स्रोत आहे.’

वैज्ञानिक डॉ. सुरजित मोंडल म्हणतात, ‘सूर्याचे चित्र काढण्यासाठी अनेक गुंतागुंती आहेत,’ यातील एक म्हणजे सूर्याचे रेडिओ उत्सर्जन केवळ वेळेत फार लवकर बदलत नाही, तर ते एका तरंगलांबीपासून जवळच्या तरंगलांबीमध्ये नाट्यमयरीत्या बदलू शकते.’ हे असे म्हणण्यासारखे आहे की, रेडिओ तरंगलांबीवरील सूर्य एका सेकंदापेक्षा कमी वेळात आणि जवळच्या समान रंगाच्या छटांमध्येही खूप वेगळा दिसू शकतो. दुसरीकडे, बहुतेक रेडिओ दूरदर्शक त्यांच्याद्वारे सर्वोत्कृष्ट प्रतिमा तयार करण्यासाठी काही मिनिटे किंवा तासांपर्यंत कमकुवत रेडिओ स्रोतांकडे टक लावून पाहण्यासाठी विकसित केलेले आहेत.

यामुळे सूर्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रतिमा अस्पष्ट होतात. जसे की वेगात असलेली गाडी ठरावीक फोटोंमध्ये अस्पष्ट दिसते. या समस्येला सामोरे जाण्यासाठी केवळ मोठ्या फ्रेम रेटसह चित्रपट तयार करणे आवश्यक नाही, तर सौर वातावरणात काय घडत आहे याचे तपशीलवार चित्र तयार करण्यासाठी मोठ्या संख्येने तरंगलांबींवरील निरीक्षण करणे आवश्यक आहे. वैज्ञानिक प्रा. दिव्या ओबेरॉय म्हणतात की, या सर्वांत तेजस्वी स्रोताचे निरीक्षण करण्यासाठी, या संशोधकांनी या-मानक निरीक्षण तंत्र विकसित केले.

डॉ. कंसाबनिक म्हणाले की, ‘या अपारंपरिक पद्धतीतून निरीक्षण करताना आम्ही दूरदर्शक प्रणाली आणि परिघीय निरीक्षण समजून घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले. तसेच, दूरदर्शक प्रणाली आणि परिघीय दृष्टी या दोन्हीच्या परिणामांचा अंदाज लावण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठी खास संगणकीय अल्गोरिदम विकसित केले.

डॉ. मोंडल म्हणतात. आकृती क्र. १ चे डावी आणि उजवी प्रतिमा अनुक्रमे २६ आणि २७ सप्टेंबर २०२० रोजी फक्त १५ मिनिटांच्या मीरकॅटद्वारे निरीक्षणांचा वापर करून घेतला आहे. या दोन्ही प्रतिमा अपवादात्मक तपशील सोडले तर अपेक्षित प्रतिमांशी जुळतात. अगदी लहान आणि अस्पष्ट वैशिष्ट्येदेखील खात्रीपूर्वक दिसून आली आहेत. सूर्याची अभूतपूर्व तपशीलवार प्रतिमा बनवण्याची मीरकॅटची क्षमता या निरीक्षणामुळे दिसली.

Web Title: Success in creating an image of the sun feat by NCR researchers, using the 'Meerkat Radio Telescope'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.