नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 01:21 PM2020-08-11T13:21:49+5:302020-08-11T13:22:53+5:30

भारतीय सामान वापरावे असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही. अशी भारतीय मालाची अवस्था आहे...

Pune Citizens demand 'Indians' and take home 'Chinese' | नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ

नागरिक मागतात 'भारतीय' अन् घरी घेऊन जातात 'चायनीज'; पुणेकरांची 'आत्मनिर्भरते'कडे पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देव्यापाऱ्यांकडे दोन्ही माल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

अतुल चिंचली -
पुणे: नागरिक आता कमी किंमतीच्या वस्तू घेण्याकडे लक्षकेंद्रित करत आहेत. चायनाच्या वस्तू गॅरंटी नसली तरी स्वस्त असतात. यंदाची बाजारपेठ थंड आहे. तरीही आमच्याकडे भारतीय आणि चिनी दोन्ही वस्तूंचा साठा आहे. सद्यस्थितीत नागरिक भारतीय वस्तूंच्या किंमती विचारतात. पण चायनाच्या कमी किंमतीच्या वस्तूच घेऊन जात आहेत. असे व्यापाऱ्यांनी लोकमतला सांगितले. 
शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये नागरिकांकडून चिनी वस्तुंना प्राधान्य दिले जात होते. परंतु मध्यंतरी चिनी वस्तूंची आयात बंद झाली. पंतप्रधान मोदींनी देशाला स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईट माळा, झुंबर, सजावटीच्या वस्तू, मोबाईल, टीव्ही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळत होत्या. त्या वस्तूंची गॅरंटी नसली तरी स्वस्तात मिळत असल्याने नागरिक चिनी वस्तू घेण्यास प्राधान्य देत होते. या पार्श्वभूमीवर लोकमत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेत्या व्यापाऱ्यांशी आणि ग्राहकांशी संवाद साधला. 
 

दुकानदार आणि नागरिक यांच्यामधील संवाद 
नागरिक :- ती पन्नास रुपयांची चायना माळ आहे का? 
दुकानदार :- पन्नासची संपली आहे, या गजरा प्रकारच्या माळा सत्तरला आहेत. 
नागरिक :- पण चायना आहेत का? 
दुकानदार :- मागच्या वर्षीच्या स्टॉकमधली चायनाचीच माळ आहे. 
दुकानदार :- इंडियन नवीन आल्या आहेत, त्या देऊ का? 
नागरिक :- नको नको, हीच चायनाची माळ द्या. कमी किंमतीची आहे, पण दोन वर्षे तरी जाते. 

...........................................................
आमच्या दुकानात बल्ब, माळा, दिवाळीच्या इलेक्ट्रॉनिक पणत्या, समई, अशा अनेक वस्तू आहेत. यापैकी बऱ्याच वस्तू चायनाच्या आहेत. आता दुकानात इंडियन आणि चायना दोन्हीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. नागरिक स्वस्त वस्तुंना प्राधान्य देतात. त्या चायनाच असतात. इंडियन वस्तूंमध्ये व्हरायटी आल्या तर नागरिक इंडियन माळ, दिवे घेतील. 
                                           भावेश देवासी ,मॅक्स इलेक्ट्रिकल 
.................................................................
चायनीज इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे डिझाईन, फिनिशिंग उत्तम असते. त्यातून त्यांची किंमतही कमी असते. इंडियन वस्तूंमध्ये हे दिसून येत नाही. पण किंमतीचा फरक मात्र जाणवतो. फॅन्सी आणि डेकोरेशनच्या लाईट, झुंबर यामध्ये चायना वस्तू लोकांना आवडतात. 
सध्यातरी अजून गर्दी वाढली नाहीये. लोक खरदेसाठी आले की कळेल. भारत सरकारने चायना वस्तूंप्रमाणे डिझाइन आणि फिनिशिंग केले. किंमतही कमी ठेवली तर लोक इंडियन वस्तूला प्राधान्य देतील. 
                                      दिनेश पटेल , लाईट वर्ल्ड 
...................................................................
रेड मी, विवो, ओप्पो,  वन प्लस अशा मोबाईल कंपनीचे उत्पादन भारतात होते. त्यावर मेड इन इंडियाच लिहितात. त्यांचे स्पेअर पार्ट चीनमधून आणले जातात.  त्यामुळे ते चायना म्हणता येणार नाही. अजूनही काही बटणचे मोबाईल मिळत आहेत. त्यांची किंमत ५०० रुपयांपासूनपुढे आहे. ते चायना पीस आहेत. ग्रामीण भागातील नागरिक असे मोबाईल घेऊन जातात. आता चायनाचे स्क्रीनटच मोबाईल आम्ही ठेवत नाही. हळूहळू नागरिक भारतीय वस्तूला प्राधान्य देतील. अशी आशा आहे. 
                                    राज पुरोहित , गीता मोबाईल एजन्सी 
...................................................................
सध्याच्या घडीला सर्व कंपनीचे टीव्ही भारतातच तयार होतात. लोक सोनी, सॅमसंग, व्हिडिओकॉन अशा कंपन्यांचे टीव्ही घेतात. साध्या कंपन्यांचे टीव्ही आणि ब्रँडेड टीव्ही यामध्ये ५,६ हजाराचा फरक असतो. साध्या कंपन्यांपैकी काही निवडक चायना कंपनी असतात. त्यांना १ वर्षाची गॅरंटी असते. ज्या लोकांचे कमी बजेट असते. ते साध्या कंपन्यांचे टीव्ही घेतात. 
                                       नितीन खेडेकर , ए टू झेड इलेक्ट्रॉनिक 
...................................................................
 आम्ही जास्तीत जास्त भारतीय सामान वापरण्याचा प्रयत्न करतो. फक्त चीन नाही तर इतर कोणत्याही देशाच्या मालापेक्षा आम्ही भारतीय माल विकत घेऊ आणि इतरांनाही हेच करायला सांगू. ह्याचा परिणाम आज दिसला नाही तरी येणाऱ्या काही वर्षात नक्की जाणवेल.
                                                  रवींद्र कोडणीकर, ग्राहक 
.............................................…...............

  भारतीय सामान वापरावे असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही. अशी भारतीय मालाची अवस्था आहे. वस्तू विकत घेताना ग्राहक म्हणून पैशाचाही विचार करावा लागतो.  भारतीय वस्तूंचा दर्जा उत्तम होणे गरजेचे आहे. देशात असणाऱ्या मध्यमवर्गीय वर्गाचा विचार केला. तर त्यांची किंमतही कमी असावी. 
                                                   - गजानन पवार , ग्राहक

Web Title: Pune Citizens demand 'Indians' and take home 'Chinese'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.