लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

By नितीन चौधरी | Published: May 2, 2024 06:16 PM2024-05-02T18:16:07+5:302024-05-02T18:16:33+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात असून, केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत...

Lok Sabha Elections 2024: Three women in Pune, Shirur, only one in Maval | लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

लोकसभा निवडणूक २०२४: पुण्यात तीन तर शिरूर, मावळात केवळ एकच महिला रिंगणात

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत राष्ट्रीय नकाशावर पोहोचली असली, तरी पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत महिला उमेदवारांची संख्या अगदीच नगण्य आहे. पुण्यात केवळ तीन, तर शिरूरमावळमध्ये प्रत्येकी एका महिलेनेच उमेदवारी अर्ज भरला आहे. बड्या राजकीय पक्षांनी महिलांना संधी दिली असती, तर महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठवता आला असता, अशी अपेक्षा या महिला उमेदवारांकडून केली जात आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवार रिंगणात असून, केवळ वंचित बहुजन आघाडीच्या माधवी जोशी या एकमेव महिला उमेदवार रिंगणात आहेत; तर शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील छाया जगदाळे-सोळंके या एकट्या महिलेनेच उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. वास्तविक शिरूर मतदारसंघात ३२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात ३५ उमेदवार असले, तरी त्यात केवळ तीन महिला उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात ३८ उमेदवारांपैकी सात उमेदवार महिला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांपैकी बारामती मतदारसंघात महिला उमेदवारांची संख्या जास्त आहे.

पुणे, शिरूर, मावळ मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २९) अर्ज माघारी घेतल्याने लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील माधवी जोशी या कर्जत विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करतात. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व कमी असल्याबद्दल त्या म्हणतात, ‘मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. महिलांनी केवळ घरकामापुरती भूमिका मर्यादित न ठेवता अन्यत्रसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे.’ निवडून आल्यास महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत काम करीन, असेही त्या म्हणतात. जोशींचा अपवाद वगळता पुणे, शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघातील महिला उमेदवार अपक्ष म्हणूनच लढत आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असलेल्या विजयालक्ष्मी सिंदगी या राष्ट्रीय मराठा पक्ष या पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहेत. तरुणांच्या प्रश्नासाठी निवडणूक लढत असल्याचे सांगून त्या म्हणतात, ‘मोठ्या राजकीय पक्षांनी महिलांना प्रतिनिधित्व दिलेले नाही. त्यामुळे महिलांना संधी मिळत नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली. २०१९ च्या तुलनेत यंदा चारीही मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या वाढली आहे; मात्र तरीदेखील महिला उमेदवारांच्या संख्येत वाढ झालेली नाही हे विशेष.

महिला उमेदवारांची संख्या

२०१९

पुणे : ०

मावळ : २

बारामती : ३

शिरूर : ४

२०२४

पुणे : ३

शिरूर : १

मावळ : १

बारामती : ७

Web Title: Lok Sabha Elections 2024: Three women in Pune, Shirur, only one in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.