किस्सा कुर्सी का: सुसंस्कृत विलासराव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:07 PM2024-04-26T15:07:33+5:302024-04-26T15:08:49+5:30

विलासराव देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालेले. त्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना विलक्षण आत्मियता होती...

Kissa Kursi Ka: Sophisticated Vilasrao deshmukh loksabha election 2024 | किस्सा कुर्सी का: सुसंस्कृत विलासराव

किस्सा कुर्सी का: सुसंस्कृत विलासराव

- राजू इनामदार

प्रचारसभेच्या एका भाषणात विलासराव देशमुख यांचा उल्लेख ‘भावी मुख्यमंत्री’ असा आधीच झाला हाेता. त्यानंतर महिनाभरातच ते खरोखर मुख्यमंत्री झाले. त्यानंतरचा त्यांचा पुण्यातील पहिलाच दौरा ठरला हाेता. विलासराव देशमुख यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच झालेले. त्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना विलक्षण आत्मियता होती. उल्हास पवार हे त्यांचे पुण्यातील जवळचे मित्र. त्यांनी पवार यांच्याकडे मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येताना आधी एका स्वातंत्र्यसैनिकाची भेट घ्यायची आहे, अशी इच्छा व्यक्त केली.

पहिली भेट स्वातंत्र्यसैनिकाची :

उल्हास पवार गप्पाजीरावांना म्हणाले की, “त्यावेळी पुण्यात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब भारदे हेच होते. विलासरावांना त्यांच्याकडे नेण्याचे ठरले. विमानतळावर उतरल्यावर लगेचच विलासरावांनी गाडी भारदे यांच्याकडे नेण्यास सांगितले. तिथे ते भारदे यांच्या पाया पडले. शाल, श्रीफळ देत त्यांचा सन्मान केला. भारदे म्हणजे जुन्या पिढीतील थोर राजकारणी. त्यांनी विलासरावांना राजकारणाचे असे काही पाठ पढवले की ऐकतच राहावे. ते सांगायचे म्हटले तर एक पुस्तक होईल. विलासराव शांतपणे सगळे ऐकून घेत होते.”

अन् विलासराव घरी आले :

भारदेंची भेट झाल्यावर विलासरावांनी सांगितले, ‘गाडी आता तुमच्या घराकडे घ्या.’ ‘मला काही कळेनाच.’ विलासरावांचे अनेक कार्यक्रम होते त्यादिवशी. तिकडे जाण्यास विलंब होत होता. विलासरावांचे आणि माझे तसे घरगुती संबंध होते. माझ्या आईला ते ओळखत. आईलाही ते माझे मित्र म्हणून माहिती होते. मुख्यमंत्र्यांनीच सांगितले म्हटल्यावर काही पर्यायच नव्हता. गाड्यांचा ताफा माझ्या घराकडे निघाला. घरी आल्या-आल्या विलासराव वाकून माझ्या आईच्या पाया पडले. तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणाले. त्यानंतर आईबरोबरही त्यांनी गप्पा मारल्या. माझ्या कुटुंबीयांची विचारपूस केली. स्वत:च्या घरात असावे तसेच विलासरावांचे वर्तन होते. माझे डोळे त्यांच्या त्या कृतीने पाणावले असे उल्हास पवार यांनी गप्पाजीरावांना सांगितले.

‘त्या’ पती-पत्नीच्या हातात हार दिला :

या दोन्ही गोष्टी केल्यानंतरच विलासरावांनी त्यादिवशी पुण्यातील बाकीचे कार्यक्रम केले. सायंकाळी अखेरचा कार्यक्रम होता संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सत्काराचा. विलासराव अनेक गोष्टींची माहिती ठेवत. त्यांनी मला कार्यक्रमाला जातानाच दोन चांगले मोठे हार बरोबर ठेवायला सांगितले. कार्यक्रम सुरू झाला. विलासरावांचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल सत्कार वगैरे झाला. त्यानंतर त्यांनी मला ते दोन हार आणायला सांगितले. सुधीर फडके व त्यांच्या पत्नी यांना व्यासपीठावर बोलावले. एक हार सुधीर फडके यांच्या हातात दिला, दुसरा त्यांच्या पत्नीच्या. लग्नाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त आता तुम्ही एकमेकांना हार घाला असे त्यांनी सांगितले. त्या एका कृतीने सगळे सभागृह विलासरावांनी जिंकले. फडके दाम्पत्य शब्दश: भारावून गेले.

संस्मरणीय कार्यक्रम :

कलावंत दाम्पत्याच्या लग्नाच्या वाढदिवसाची अशी माहिती ठेवणे, त्याबद्दल भर कार्यक्रमात नियोजन नसतानाही त्यांचा असा सत्कार करणे अशा गोष्टी विलासरावच करू जाणे. नंतरच्या भाषणात बाबूजींच्या पत्नीने त्यांच्या लग्नात महमंद रफी यांनी मंगलाष्टके म्हटली होती ही आठवण सांगितली. सगळा कार्यक्रमच विलासरावांच्या सुसंस्कृत वागण्याबोलण्यामुळे संस्मरणीय होऊन गेला.

- गप्पाजीराव

Web Title: Kissa Kursi Ka: Sophisticated Vilasrao deshmukh loksabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.