Indian Railway: रेल्वेतून फुकटचा प्रवास पडला महागात; भरला चार कोटींचा दंड

By अजित घस्ते | Published: May 4, 2024 06:27 PM2024-05-04T18:27:35+5:302024-05-04T18:27:55+5:30

या महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्यांकडून जवळपास चार कोटींचा दंड आकारून वसूल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली...

Indian Railway: Free travel by train has become expensive; A fine of four crores was paid | Indian Railway: रेल्वेतून फुकटचा प्रवास पडला महागात; भरला चार कोटींचा दंड

Indian Railway: रेल्वेतून फुकटचा प्रवास पडला महागात; भरला चार कोटींचा दंड

पुणे : उन्हाळी सुटी, लोकसभा निवडणूक व लग्नसराईमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यात फुकट्या प्रवाशांची भर पडत असल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर पुणे विभागाकडून धडक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. एप्रिलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५० हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या महिन्यात विनातिकीट प्रवासी, अनियमित प्रवास आणि सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्यांकडून जवळपास चार कोटींचा दंड आकारून वसूल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

पुणे विभागात एप्रिलमध्ये ३५ हजार १२९ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तीन कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १४ हजार ४६३ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आले. त्याच्याकडून ९३ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर २४३ प्रवासी हे सामान बुक न करता प्रवास करताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३३ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशी जवळपास चार कोटींचा दंड आकारत धडक कारवाई केली.

यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक व रेल्वे सुरक्षा दल यांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. तसेच रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे रेल्वे विभागाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Indian Railway: Free travel by train has become expensive; A fine of four crores was paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.