आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 05:56 PM2024-04-19T17:56:15+5:302024-04-19T17:57:31+5:30

पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली...

Ashadhi Paiwari 2024: Two days stay in Pune and two and half days in Lonand by palanquin | आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम

आषाढी पायीवारी: प्रस्थानाचा दिवस ठरला! पुण्यात २ दिवस, लोणंदला अडीच दिवस पालखीचा मुक्काम

आळंदी (पुणे) : यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी दिली. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटना यांची सोमवारी (दि. १८) पंढरपुरात पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

बैठकीत सोहळ्यातील सोयीसुविधा, समस्या आदी विविध विषयांवरील चर्चेनंतर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याप्रसंगी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, विठ्ठल महाराज वासकर, राणा महाराज वासकर, नामदेव महाराज वासकर, माउली महाराज जळगावकर, भाऊसाहेब महाराज गोसावी, मारुती महाराज कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर आदिंसह दिंडीकरी, फडकरी उपस्थित होते.

प्रथा - परंपरेनुसार रविवार दि. २९ जूनला सायंकाळी साडेचारच्या सुमारास वाजत - गाजत माउलींच्या पालखीचे समाधी मंदिरातून प्रस्थान होईल. त्याचदिवशी दर्शनबारी मंडपात (आजोळी) माउलींचा पहिला मुक्काम असणार आहे. ३० जून व १ जुलैला पालखी सोहळा पुण्यनगरीत मुक्कामी राहील. दि २ व ३ जुलैला सासवड, त्यानंतर ४ जुलैला जेजुरी, ५ जुलैला वाल्हे, त्यानंतर नीरा स्नाननंतर ६ जुलैपर्यंत पालखी सोहळा लोणंद येथे मुक्कामी जाईल. त्यांनतर ८ जुलैला तरडगाव, ९ जुलैला फलटण, १० जुलैला बरड, ११ जुलैला नातेपुते, १२ जुलैला माळशिरस, १३ जुलैला वेळापूर मुक्कामी असणार आहे. १६ जुलैला पालखी सोहळा पंढरीत पोहचणार असून मुख्य आषाढी एकादशी सोहळा १७ जुलै आहे. 

पंढरीत आषाढी एकादशीचा महासोहळा १७ जुलैला संपन्न होईल. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब येथे पाहिले उभे रिंगण, पुरंडवडे येथे पाहिले गोल रिंगण, खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण, ठाकुरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण, वाखरीच्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण, इसबावी पादुकांजवळ पंढरपूर प्रवेशापूर्वी तिसरे उभे रिंगण होईल. ३२ दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा पुन्हा ३० जुलैला आळंदीत परतणार असल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली

Web Title: Ashadhi Paiwari 2024: Two days stay in Pune and two and half days in Lonand by palanquin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.