निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बारामतीत विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:33 PM2024-04-01T17:33:46+5:302024-04-01T17:34:34+5:30

पोलिसांनी खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे....

A case has been filed against the extension officer in Baramati for dereliction of election duty | निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बारामतीत विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

निवडणूक कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बारामतीत विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

बारामती (पुणे) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सी व्हिजिल अॅपवर आलेल्या तक्रारीचे वेळेत निराकरण न करता, विना परवानगी मुख्यालय सोडणे, उपविभागीय अधिकाऱ्यांनी विचारणा केल्यावर त्यांना उर्मट भाषा वापरल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. याप्रकरणीउपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी खंडाळे यांच्या विरोधात लोकप्रतिनिधित्व अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देणयात आल्या आहेत. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रय खंडाळे यांना भरारी पथक क्रमांक १ चे प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांच्या सोबतीचा कृषी सेवक महेश शेंडे, पोलिस नाईक जाफर शेख यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणूक कालावधीत सी व्हिजिल अॅपवर एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील ५० मिनिटात त्याची चौकशी करून अहवाल अॅपवर पाठवणे आवश्यक आहे. दि. ३० मार्च रोजी सायंकाळी ७. २९ वाजता होळ (ता. बारामती) येथील तक्रारदार दीपक जनार्दन वाघ यांनी या अॅपवर एक तक्रार केली. ही तक्रार तत्काळ जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत कार्यवाहीसाठी खंडाळे यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी ५० मिनिटात तक्रारीवर कार्यवाही करत अहवाल सादर करणे आवश्यक होते.

उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी रात्री ८. १५ वाजता अॅपवर लाॅगिन केले. यावेळी ही तक्रार प्रलंबित असल्याचे दिसून आले. त्यांनी खंडाळे यांना फोनवरून विचारणा केली. यावेळी त्यांनी मी कामानिमित्त पुण्याला आलो असल्याचे सांगितले. शेख यांना विचारणा केली असता त्यांनी मी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी निघालो असल्याचे सांगितले. ही तक्रार कार्यारंभ आदेश नसताना काम सुरु असल्याबाबत होती. ती ग्रामपंचायत हद्दीतील असल्याने आचारसंहिता कक्षाचे प्रमुख गटविकास अधिकारी डाॅ. अनिल बागल यांनाही उपविभागीय अधिकाऱ्यांनी तक्रारीची कल्पना दिली. त्यांनीही खंडाळे यांना विचारणा केली असता त्यांनी मी तेथे पोहोचत असल्याची चुकीची माहिती दिली.

बराच वेळ उलटूनही तक्रारीचे निराकरण होत नसल्याने उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी व खंडाळे यांचे काॅन्फरन्स काॅलवर बोलणे झाले. त्यांनी नातेवाईकाचा अपघात झाल्याने पुण्याला गेलो होतो, आता मी मोरगावला पोहोचलो आहे असे उत्तर दिले. परंतु निवडणूक कर्तव्यावर असताना त्यांनी बाहेर जाताना वरिष्ठांना कल्पना दिली नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांना उर्मट भाषा वापरली. त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही खोटे बोलत आहात, तुमच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवावा लागेल असे सांगितले. खंडाळे यांनी माझ्यावर काय कारवाई करायची ती करा, मी काम करणार नाही, अशी उपमर्द करणारी भाषा वापरली.

पथकप्रमुख अनुपस्थित असल्याने अखेर ही तक्रार ड्राॅप केली गेली. परंतु ही कार्यवाही १ तास ४९ मिनिटाने झाली. यात खंडाळे यांनी निवडणूक विषयक कर्तव्यात कसूर केली. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नावडकर यांच्याशी उर्मट वर्तन केल्याने त्यांच्या विरोधात फिर्याद देण्यात आली.

Web Title: A case has been filed against the extension officer in Baramati for dereliction of election duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.