मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 12:59 PM2021-04-15T12:59:13+5:302021-04-15T13:54:53+5:30

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून उपमुख्यमंत्री लक्ष्य

pandharur assembly by election bjp leader chandrakant patil slams deputy cm ajit pawar | मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

मला चंपा बोलणं थांबवा, अन्यथा...; चंद्रकांत पाटील यांचा अजित पवारांना थेट इशारा

Next

सोलापूर: राष्ट्रवादीचे आमदार भारत भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीनं भारत भालकेंचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीनं जोर लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं आहे. 

“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”

भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी आलेले अजित पवार अनेकदा भाजपला लक्ष्य करत आहेत. महाविकास आघाडीचं सरकार मजबूत आहे. हे सरकार पाडणं येऱ्यागबाळ्याचं काम नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर हल्ला चढवत आहेत. अजित पवारांकडून होत असलेल्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपूर-मंगळवेढ्यात येऊन गल्लोगल्लीत फिरावं लागत आहे. फारशा महत्त्वाच्या नसलेल्या लोकांच्या भेटीगाठी घ्याव्या लागत आहेत. हा अजित पवारांचा स्वभाव नाही, असा खोचक टोला पाटील यांनी लगावला.

रोहित पवार म्हणाले, "राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण..."

'अजित पवारांना काय झालंय माहीत नाही. ते अलीकडे जरा जास्तच जोरात आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचं म्हटलं होतं आता मी अजित पवारांवर एम. फिल. करणार आहे. कारण इतकं सगळं करूनही ते छातीठोकपणे बोलत आहेत. त्यांची सिंचन प्रकरणी चौकशी सुरू आहे. बँक घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आहे. राज्यातले अनेक साखर कारखाने अडचणीत येतात आणि अजित पवार ते खरेदी करतात. अजित पवारांचे नेमके किती साखर कारखाने आहेत, हे त्यांनी एकदा सांगावं,' असं पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र; मोदींकडे केल्या दोन महत्त्वाच्या मागण्या

'सत्तेत असलेल्या व्यक्तीनं नम्र राहावं. पण अजित पवार नाक वरून चालत आहेत. सरकार कोणाचंही असलं तरी हेच उपमुख्यमंत्री होतात आणि इतकं सगळं करूनही ते अशी विधानं करतात. या सगळ्यासाठी हिंदीत 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज' अशी एक म्हण आहे. कालचक्र सतत फिरत असतं. त्यामुळे अजित पवारांनी फार गमजा मारू नयेत. त्यांनी नीट बोलावं,' असा इशारा पाटील यांनी दिला.

सरकार पडणार नाही असं अजित पवारांना सारखं का सांगावं लागतं, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. सरकार पडणार नसल्याचा विश्वास असेल तर मग इतकं आकांडतांडव कशासाठी करता? आम्ही काही सत्ताबदलाची आस लावून बसलेलो नाही. पण राज्यात सत्ताबदल कसा होणार हे अजित पवारांना माहीत आहे. ते सध्या खोटा आव आणत आहेत, अशा शब्दांत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मला चंपा म्हणणं बंद करा. अन्यथा मग मीदेखील पार्थ पवार आणि इतरांचे शॉर्टफॉर्म सांगेन, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: pandharur assembly by election bjp leader chandrakant patil slams deputy cm ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.