पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:38 AM2024-04-26T08:38:13+5:302024-04-26T08:38:54+5:30

‘दृश्यम’ चित्रपट स्टाईलने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नेऊन जाळणार्‍या संशयिताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले....

'Vishyam' style to mislead police, murder mastermind jailed | पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेरबंद

पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ‘दृश्यम’ स्टाईलने बनाव, खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जेरबंद

पिंपरी : भावाच्या खुनाचे सोशल मीडियावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय तरूणाचा अपहरण करून खून केला. त्यानंतर ‘दृश्यम’ चित्रपट स्टाईलने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नेऊन जाळणार्‍या संशयिताला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केले.  

राहुल संजय पवार (३४, रा. म्हाळूंगे इगळे, ता. खेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खेड तालुक्यातील रासे फाटा येथील मराठा हॉटेलमध्ये हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर हॉटेलमध्ये घुसून १८ मार्च रोजी काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील जखमी झाले. या प्रकरणी राहुल संजय पवार (रा. म्हाळुंगे इंगळे), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी अजयला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दुसरा संशयित अमर नामदेव शिंदे (२५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला २३ मार्च रोजी अटक केली.

पोलिसांनी अमरची कसून चौकशी केली. गोळीबाराच्या घटनेच्या आधी १६ मार्चला राहुल पवार याने साथीदारांच्या मदतीने आदित्य युवराज भांगरे (१८, रा. म्हाळुंगे, ता. खेड) याचा खून केल्याची माहिती अमरने दिली. राहुलचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे फोटो आदित्यने सोशल मीडियावर स्टेट्सला ठेवले. त्याचा राग राहुलच्या डोक्यात होता. त्यावरून राहुलने दोन साथीदारांसोबत मिळून १६ मार्चला आदित्यचे अपहरण करून त्याचा खून केला. 

खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी संशयितांनी ‘दृश्यम’ चित्रपट स्टाईलने पोलिसांची दिशाभूल केली. खेड तालुक्यातील निमगाव येथे लाकडे पेटवून तिथे आदित्यचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव केला. तसेच, आदित्यचा मोबाईल गोवा येथे एका संशयितासोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. मात्र, आदित्यचे अपहरण झालेल्या परिसतराील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी संशयितांचा माग काढला. संशयितांनी आदित्यचा गाडीत खून केल्यानंतर त्याचा मृतदेह महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा येथे जंगलात जाळला होता. तेथून अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. 

पेहराव बदलला पण...

मुख्य संशयित राहुल पवार याच्यासह टोळीवर पोलिसांनी ‘मोक्का’अंतर्गत कारवाईही केली. मात्र, राहुल पसार होता. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्याने टक्कल करून दाढी-मिशीही काढली. त्याच्या संपर्कातील ६७ लोकांकडे चौकशी केली. तो वावरत असलेल्या नाशिक फाटा भागातील १२४ सीसीटीव्ही फुटेज तपासले. राहुल हा औंध येथे येणार असल्याबाबत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हरीश माने यांना २२ एप्रिलला माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून रिक्षातून आलेल्या राहुलला ताब्यात घेतले. मात्र, पेहराव बदलेल्या राहुलने आपले नाव सागर संजय मोरे असे सांगितले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण राहुल असल्याची कबुली दिली. 

आणखी खून करण्याचा डाव उधळला

पोलिसांनी राहुल पवार याच्याकडे कसून चौकशी केली. चौकशीत त्याने आपण भावाच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताना मदत करणार्‍या आणखी दोन ते तीन जणांचा खून करण्याच्या तयारीत होतो, अशी धक्कादायक माहिती दिली. गुंडा विरोधी पथकाने जेरबंद केल्याने त्याचा डाव उधळला.

Web Title: 'Vishyam' style to mislead police, murder mastermind jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.