PM Awas : 56 हजारहून अधिक लोकांना मिळणार नवीन घरे, मोदी सरकारने दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:40 PM2021-02-23T14:40:17+5:302021-02-23T15:04:00+5:30

Pradhan Mantri Awas Yojana 2021: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 56368 नवीन घरे बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

Pradhan Mantri Awas Yojana 2021: स्वत:चे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. स्वस्त घर खरेदी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे बांधण्यास परवानगी दिली आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 56368 नवीन घरे बांधण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. Central Sanctioning and Monitoring Committee च्या 53 व्या बैठकीला ही मंजुरी देण्यात आली.

गृहनिर्माण व नगरविकास मंत्रालयाने 2022 पर्यंत देशातील सर्व लाभार्थ्यांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या बैठकीत 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की, सन 2022 पर्यंत एक कोटी 12 लाख घरांच्या मागणीपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी 11 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे.

याचबरोबर, 73.10 लाख घरांचे पायाभूत काम पूर्ण झाले असून 42.70 लाख घरे लाभार्थ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती हरदीपसिंग पुरी यांनी दिली.

दरम्यान, मोदी सरकारने 2022 पर्यंत देशातील सर्व कुटुंबांना पक्के घर देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारची ही योजना 25 जून 2015 रोजी सुरू झाली.

या योजनेंतर्गत एक कोटी घरे बांधण्याचे सरकारने लक्ष्य केले आहे, मात्र, सध्या सरकार ज्या वेगाने काम करत आहे, ते पाहता हे लक्ष्य 2022 पूर्वी पूर्ण होईल असे म्हटले जाते.

या बैठकीत लाइट हाऊस प्रोजेक्ट्स (LHPs) आणि डेमोन्सट्रेशन हाऊसिंग प्रोजेक्ट्सच्या (DHPs) कामांचा आढावा घेण्यात आला. लाइट हाऊस प्रोजेक्ट्सचा पाया 1 जानेवारी 2021 रोजी पंतप्रधान मोदींनी घातला.

एलएचपीअंतर्गत लखनौ, रांची, राजकोट, अगरतला, चेन्नई आणि इंदूरमध्ये घरे बांधली जात आहेत. याचबरोबर, केंद्र सरकारने एलएचपींसाठी ऑनलाईन नोंदणी मोहीम देखील सुरू केली आहे.

यामुळे सरकार लोकांसाठी तांत्रिक जागरूकता, सहभाग, साइटवर शिकणे, समाधानासाठी उपाय शोधणे, प्रयोग आणि नावीन्यपूर्ण गोष्टींना प्रोत्साहन देणार आहे.