उष्णतेचा कहर! जास्त वेळ उन्हात राहिल्यास होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमध्ये खुलासा, अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:16 AM2024-04-21T10:16:33+5:302024-04-21T10:30:19+5:30

उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. बहुतांश लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. याच दरम्यान रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशासह राज्यात सध्या उष्णता कमालीची वाढली आहे. त्यामुळे सर्वच जण चिंतेत असून उकाड्याने पार हैराण झालेत. उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. बहुतांश लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. याच दरम्यान रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका रिपोर्टनुसार, उन्हामुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढत आहे. या कॅन्सरला मेलेनोमा कॅन्सर असंही म्हणतात. हा कॅन्सर शरीराच्या त्या भागांमध्ये जास्त होतो ज्यावर कडक ऊन पडतं.

कॅन्सर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कडक उन्हात प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं संरक्षण केलं पाहिजं. स्वतःला शक्य तितकं हायड्रेटेड ठेवा. दुपारी 11 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हातून बाहेर न जाण्याचा प्रयत्न करा, असंही सांगण्यात आलं आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सकाळी 7 ते 9 या वेळेतच घराबाहेर पडा. या काळात व्हिटॅमिन डी उपलब्ध असतं आणि त्यानंतरचा सूर्यप्रकाश शरीरासाठी जास्त घातक असतो. कडक उन्हात बाहेर पडू नका, जरी तुम्ही बाहेर गेलात तरी स्वतःची काळजी घ्या.

सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो. तसेच ज्या लोकांची इम्युनिटी कमकुवत आहे त्यांना स्किन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. इतर देशांच्या तुलनेत भारतात स्किन कॅन्सरचा धोका कमी आहे. कॅन्सरचा धोका विशेषतः मान आणि हातांना जास्त असतो.

स्किन कॅन्सरची लक्षणं शरीरावर दिसतात. जर अंगावर चामखीळ दिसली तर ते स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं. त्वचेवर पांढरे डाग, खाज आणि जखमा, मानेवर लाल रंगाचा पॅच, त्वचेवर काही बदल दिसले तर ती स्किन कॅन्सरची लक्षणं असू शकतात.

त्वचेसंबंधीत काहीही त्रास जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाढत्या उष्म्याबरोबर उन्हाळ्यातील आजार डोके वर काढतात. अशावेळी आहार, व्यायाम आणि काही साध्या गोष्टींचे आवर्जून पालन करावे लागते.

अन्यथा शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा समतोल बिघडल्याने व्यक्तीला चक्कर, डोळ्यासमोर अंधारी येण्यासह डोळ्यांची आग होणं, थकवा यांसारख्या विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

उन्हात घराबाहेर पडताना सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं.

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची आवश्यकता असल्याने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करण्याची गरज आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, नारळपाणी, फळांचा ज्यूस कैरी पन्हे, ताक प्यावं. पचायला हलका असलेला आहार घ्यावा.