"मोदीला मी देव मानत नाही"; उद्धव ठाकरेंनी तुळजापुरातून रणशिंग फुंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 08:56 AM2024-03-08T08:56:09+5:302024-03-08T09:46:04+5:30

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर असून धाराशिवमधूनच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.

शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर असून धाराशिवमधूनच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील औसा, उमरगा आणि तुळजापूर येथे उद्धव ठाकरेंनी जाहीर सभांना संबोधित केले. मी माझ्या निष्ठावंत आणि शिवसैनिकांशी संवाद साधत असल्याचं त्यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात लोकसभा निवडणुकीत शिवसेना मशाल चिन्हावरील उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन जनतेला केला. तसेच, मोदी-शाह यांच्यावर घणाघात केला.

उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला मोठा गर्व झाला आहे, या गर्वाचं घर आपण खाली करायचंय, असे म्हटले.

भाजपात केवळ दोनच नेत्यांचं चालत असल्याचं म्हटलं. यावेळी, उद्धव ठाकरेंनी मोदींना स्वागतासाठीच्या पुष्पहारातही दुसरा माणूस चालत नसल्याचे सांगत राजनाथसिंह यांचे उदाहरणही दिले.

अमित शाह तुम्ही जर कोणत्या दैवताला मानत असाल, मोदी सोडून. मोदीला मी देव मानत नाही, मी माझ्या आई भवानीला देवी मानतो, देवता मानतो.

ती आमची आई आहे. तिच्या साक्षीने, तिची शपथ घेऊन मी जनता जनार्दनाला सांगतो की, भाजपाने माझ्या, आपल्या पाठीत वार केला, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

मी खुर्चीसाठी, सत्तेसाठी कधीही आसुसलेला नव्हतो, अडीच वर्षे जी मी मागितली होती ती शिवसेनेसाठी मागितली होती माझ्यासाठी नव्हती, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपानेच दगाफटका केल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आजही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी सभा घेणार आहेत. धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरेंप्रति निष्ठा जपत शिंदेंसोबत न जाण्याचा निर्णय घेतला होता.