फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी

By नारायण जाधव | Published: April 25, 2024 04:06 PM2024-04-25T16:06:00+5:302024-04-25T16:06:20+5:30

पर्यावरणप्रेमी हादरले : मँग्रोव्ह सेल चौकशी करणार

Flamingo deaths continue unabated, 5 more birds dead and 7 injured | फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी

फ्लेमिंगोचे मृत्यूसत्र थांबता थांबेना, आणखी ५ पक्ष्यांचा मृत्यू तर ७ जखमी

नवी मुंबई : डीपीएस तलावाजवळ गुरुवारी पहाटे आणखी पाच फ्लेमिंगो रहस्यमयरीत्या मृतावस्थेत तर सात जखमी अवस्थेत आढळून आल्याने पक्षी आणि पर्यावरणप्रेमी कमालीचे हादरले आहेत. एकट्या नेरूळमध्ये एका आठवड्यात मृत फ्लेमिंगोची संख्या ८ वर पोहोचली आहे. कोरड्या तलावात अन्न न मिळाल्याने ते इतस्तत: भटकून पक्षी विचलित होत असावेत, असा पक्षीप्रेमींचा अंदाज आहे.

मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप्सवर याबाबत ॲलर्ट देताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे पक्षी बचावकर्ता सनप्रीत सावर्डेकर आणि त्यांच्या टीमने जखमी गुलाबी पक्ष्यांना ठाण्यातील मानपाडा येथील रुग्णालयात हलवले. तर वनविभागाने सात पक्ष्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते पनवेल येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, असे परिक्षेत्र वन अधिकारी सुधीर मांढरे यांनी सांगितले. दरम्यान, येथील नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून नवी मुंबईतील फ्लेमिंगोंसह जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे.

नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार म्हणाले की, ही आजची दुसरी शोकांतिका आहे. गेल्या शुक्रवारी तीन फ्लेमिंगो मृत आणि एक जखमी अवस्थेत आढळला होता. कुमार यांनी १४१ वर्षे जुनी संशोधन संस्था बीएनएचएसकडेदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे तसेच नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि राज्य मँग्रोव्ह सेलला याबाबत सतर्क केले आहे. डीपीएस तलाव नेहमीच एक आंतर-भरतीसंबंधीचा ओलसर जमीन, पाण्याचे प्रवेश अवरोधित केल्यामुळे कोरडा राहते. नेरूळ जेट्टीच्या रस्त्याखाली तलावाच्या दक्षिणेकडील एक भाग रस्त्यात गाडला गेला असून ही जलवाहिनी पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे, असे कुमार म्हणाले.

अभ्यासाठी पथक येणार
अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक व्ही. एस. रामाराव म्हणाले की, परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि कारवाई सुचवण्यासाठी एक पथक घटनास्थळी पाठवले जाईल. तर सेव्ह फ्लेमिंगोज अँड मँग्रोव्हज फोरमच्या रेखा सांखला यांनीही तलावातील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू करण्याची विनंती महापालिकेसह सिडकोला केली आहे.

बीएनएचएसही फ्लेमिंगोंच्या आरोग्यासाठी आग्रही
बीएनएचएसचे उपसंचालक डॉ. राहुल खोत यांनीही फ्लेमिंगो रस्त्यावर येणा-या घटना आणि त्यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त केला आहे. तसेच आमची संस्था नवी मुंबईतील पाणथळ जागा योग्य आरोग्यासाठी राखण्यासाठी आग्रही असल्याचे सांगून भरतीच्या वेळी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात येथून पक्षी येथे येत असल्याचे सांगितले.

Web Title: Flamingo deaths continue unabated, 5 more birds dead and 7 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.