'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:01 AM2024-05-10T09:01:37+5:302024-05-10T09:01:50+5:30

Covishield Vaccine : अ‍ॅस्ट्राझेनेकाने कोव्हिशिल्ड लसीबाबत केलेल्या खुलाशानंतर सीरम इन्स्टिट्यूटने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Serum Institute gave its response amid the side effects of Covishield | 'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण

Covishield Side Effects : गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरील कोव्हिशिल्ड लसीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर तेव्हापासून अ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरातील त्यांची लस विक्री थांबवत असल्याचे सांगितले. दरम्यान, भारतात ही लस सीरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्राझेनेकासोब मिळून ही लस तयार केली होती. आता सीरम इन्स्टिट्यूटनेही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

कोरोना व्हायरस विरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली गेल्या महिन्यात अ‍ॅस्ट्राझेनेकाने दिल्याने जगभरात खळबळ उडाली. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात अ‍ॅस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून कोव्हिशिल्ड ही लस तयारी केली होती. त्यानंतर ही लस भारतासह जगभरातील नागरिकांना देण्यात आली होती. त्यामुळे आता भारतीयांमध्येही चितेंचे वातावरण निर्माण झालंय. अशातच सीरम इन्स्टिट्यूटचे म्हणणे आहे की त्यांनी डिसेंबर २०२१ मध्येच लसीचे उत्पादन थांबवले होते. लसीचे सर्व दुष्परिणाम त्याच्या पाकिटांवर लिहिले होते असेही सीरमने म्हटलं आहे.

"२०२१ आणि २०२२ मध्येच भारतात कोरोनावरील लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक होते. तसेच, नवीन लसी तयार केल्यामुळे पूर्वीच्या लसींची मागणी लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यामुळे आम्ही डिसेंबर २०२१ पासून कोव्हिशिल्डचे उत्पादन आणि विक्री थांबवली," असे सीरमच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. तसेच 'आम्ही सुरुवातीपासूनच पॅकेजिंगवर थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) आणि थ्रोम्बोसिससह सर्व दुर्मिळ दुष्परिणामाबाबत उघड लिहिले आहेत,' असं स्पष्टीकरण देखील सीरमने लसीच्या दुष्परिणामाबाबत दिलं आहे.

२०२१ मध्ये कोव्हिशिल्ड पॅकेटमध्ये लसीचे दुष्परिणाम लिहीले होते. ज्या लोकांना गोठणे (थ्रॉम्बोसिस) आणि ऑटोइम्यून विकार आहेत त्यांनी लस वापरणे टाळावे, अशा आशयाची सूचना पॅकेटवर लिहीली होती. मात्र टीटीएस आणि इतर दुर्मिळ दुष्परिणामांमुळे मरण पावलेल्यांचे कुटुंबिय असा युक्तिवाद करतात की लसीकरण मोहिमेदरम्यान लस घेतलेल्यांना याची माहिती देण्यात आली नव्हती. लसीचे काय परिणाम होतील याची त्यांना कल्पना नव्हती.

दरम्यान, देशाच्या कोविड-१९ लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतात कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. यापैकी सिरमने कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन हे भारत बायोटेकने बनवले होते. कोवॅक्सिनच्या तुलनेत कोव्हिशिल्डचा अधिक वापर करण्यात आला होता. जानेवारी २०२१ पर्यंत सुमारे १७० कोटी डोस नागरिकांना देण्यात आले होते.
 

Web Title: Serum Institute gave its response amid the side effects of Covishield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.