‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:20 AM2020-06-19T00:20:13+5:302020-06-19T07:09:28+5:30

जिवंत पाणीसाठा २,७०० द.ल.घ.मी. : मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर, इंदिरा सागर धरणातील विसर्गाचा लाभ

Sardar Sarovar Dam water level rises | ‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

‘सरदार सरोवरा’ची पाणीपातळी वाढली; पूर्ण क्षमतेने भरण्यास फक्त ११ मीटर बाकी

Next

अहमदाबाद : गुजरातमध्ये मान्सूनचे आगमन नुकतेच झाले असले तरी नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. आता धरणात १२७.४६ मीटर पाणी असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ ११ मीटर बाकी आहे.

सरदार सरोवराच्या वरच्या भागात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे धरणात पाणी येत आहे. विशेषत: मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून खाली पाणी येत आहे. आता धरणातील जिवंत पाणीसाठा २,७०० दशलक्ष घनमीटर झाला आहे.

सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडचे संचालक पी. सी. व्यास यांनी सांगितले की, धरणातील पाण्याची पातळी १२७.४६ मीटर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी ११.२२ मीटरच बाकी आहे. धरणाची एकूण पाणीधारण उंची १३८.६८ मीटर आहे.

गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित असलेल्या सरदार सरोवर धरणात गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण १३८.६८ मीटर क्षमतेने पाणी आले होते. २०१७ मध्ये उंची वाढविली गेल्यापासून पहिल्यांदाच धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.

सोडलेले पाणी कोरड्या तलावात
व्यास यांनी सांगितले की, वीज निर्मिती केंद्रांतून सोडले जाणारे पाणी धरणाखालील भागातील कोरडे तलाव भरण्यासाठी तसेच कालव्याच्या माध्यमातून शेतीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्याची गरजही या पाण्यातून भागविली जात आहे.
सूत्रांनी सांगितले की, अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे यंदा जूनमध्येच धोऽऽ धो पाऊस पडला आहे. सरदार सरोवराच्या पानलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे सरोवरात चांगले पाणी आले आहे.

वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू
व्यास यांनी सांगितले की, सध्या धरणात ४० हजार क्युसेक्सने पाणी येत आहे. नदीपात्रातील तसेच कालव्याच्या तोंडाशी अशा दोन्ही ठिकाणची वीज निर्मिती केंद्रे बुधवारपासून सुरू करण्यात आली आहेत. नदीपात्रातील वीज निर्मिती केंद्रात १ हजार मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. कालव्याच्या तोंडाशी असलेल्या दोन वीज निर्मिती केंद्रांत १०० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. वीज निर्मिती केंद्रांद्वारे ७ हजार क्युसेक्स पाणी नर्मदा मुख्य कालव्यात सोडले जात आहे. तसेच ३३,००० क्युसेक्स पाणी नर्मदा नदीपात्रात सोडले जात आहे.

व्यास यांनी सांगितले की, नदीपात्र आणि कालवा मुख या दोन्ही ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रांतून सध्या दररोज १७ ते २० दशलक्ष युनिट वीज निर्माण होत आहे. या विजेची दररोजची किंमत ३.५ कोटी ते ४ कोटी रुपये आहे.

Web Title: Sardar Sarovar Dam water level rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.