'आप'ला धक्का, दिल्ली मद्य घोटाळ्यात १७ वी अटक, ईडीने चरणप्रीत सिंगला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 08:43 AM2024-04-16T08:43:57+5:302024-04-16T08:44:28+5:30

ईडीने चरणप्रीत सिंग याच्यावर २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचारासाठी निधी पुरवल्याचा आरोप केला आहे.

delhi excise policy ed arrests aap worker charanpreet singh arvind kejriwal hawala | 'आप'ला धक्का, दिल्ली मद्य घोटाळ्यात १७ वी अटक, ईडीने चरणप्रीत सिंगला केली अटक 

'आप'ला धक्का, दिल्ली मद्य घोटाळ्यात १७ वी अटक, ईडीने चरणप्रीत सिंगला केली अटक 

नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चरणप्रीत सिंग याला अटक केली आहे. या प्रकरणातील ही १७वी अटक आहे. ईडीने चरणप्रीत सिंग याच्यावर २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या (आप) प्रचारासाठी निधी पुरवल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ईडीचा तपास राजकीय हेतूने प्रेरित आहे. ईडीला या प्रकरणात अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही, असे आपने म्हटले आहे.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, चरणप्रीत सिंगला १२ एप्रिलला पीएमएलए अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चरणप्रीत सिंगला १८ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ईडीने यापूर्वीच दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के. कविता यांच्यासह अनेकांना अटक केली आहे.

सीबीआयने याआधी चरणप्रीत सिंगला याच प्रकरणात अटक केली आहे. मनी लाँड्रिंगचे हे प्रकरण सीबीआयच्या एफआयआरवर आधारित आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, चरणप्रीत सिंगने २०२२ च्या गोवा निवडणुकीदरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी रोख रकमेची व्यवस्था केली होती. चरणप्रीत सिंगचे आपशी घनिष्ट संबंध आहेत.

याचबरोबर, के. कविता, ओंगोल लोकसभा मतदारसंघातील टीडीपी उमेदवार मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, त्यांचा मुलगा राघव मागुंटा, व्यावसायिक सरथ चंद्र आणि इतरांनी दिल्लीत दारूच्या परवान्यासाठी आपला १०० कोटी रुपयांची लाच दिली होती, असा आरोप ईडीचा आहे. तसेच, या लाचेच्या रकमेपैकी ४५ कोटी रुपये गोवा निवडणूक प्रचारात पक्षाने वापरल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

आपने गोव्यातील निवडणूक प्रचाराशी संबंधित कामांसाठी सर्व्हे वर्कर्स, एरिया मॅनेजर्स, अॅसेंब्ली मॅनेजर्स आणि इतरांना रोख रक्कम दिली होती, असा आरोप आहे. या कामाची जबाबदारी चरणप्रीत सिंगच्या नावावर सोपवण्यात आल्याचे या लोकांनी ईडीला सांगितले. दिल्लीचे रहिवासी चरणप्रीत सिंग हे हवाला ऑपरेटर्सकडून पैसे गोळा करत होते आणि आपच्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी हे पैसे वितरित करत होते, असे ईडीचे म्हणणे आहे. 

Web Title: delhi excise policy ed arrests aap worker charanpreet singh arvind kejriwal hawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.