चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:08 AM2024-04-26T10:08:03+5:302024-04-26T10:09:01+5:30

१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे.

China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected | चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

चीनने सियाचीनमध्ये बांधला काँक्रीटचा रस्ता; सॅटेलाईट इमेजनं ड्रॅगनचं बिंग फुटले

नवी दिल्ली - चीनने कुरापती पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. आता तो पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) सियाचीन हिमनदीजवळ रस्ता बनवत आहे. उपग्रह छायाचित्रांच्या माध्यमातून चीनचे हे बिंग फुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा रस्ता काँक्रीटचा आहे. यावर भारताने आक्षेप घेतला आहे.

हा रस्ता बेकायदेशीरपणे व्यापलेल्या काश्मीरमध्ये म्हणजेच सियाचीनच्या उत्तरेला, जगातील सर्वात उंच युद्धभूमीमध्ये बांधला जात आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, १९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. हा भाग चीनच्या शिनजियांगला लागून आहे. हे सियाचीन हिमनदीच्या इंदिरा कोलच्या (भारताचे उत्तरेकडील सर्वात शेवटचे क्षेत्र) उत्तरेस ५० किलोमीटर अंतरावर आहे.

रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल राकेश शर्मा म्हणाले की, चीनच्या दिशेने तयार करण्यात येत असलेला रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर आहे. भारताने या प्रकरणाचा मुत्सद्दीपणे विरोध केला पाहिजे. ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ कारगिल, सियाचीन ग्लेशियर आणि पूर्व लडाखमध्ये तैनात आहे. मात्र, या संदर्भात भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. ते येण्याची शक्यता आहे.

कुणी टिपले छायाचित्र?
वृत्तानुसार युरोप अंतराळ संस्थेने काढलेल्या उपग्रहातून स्पष्ट झाले आहे की, हा रस्ता गतवर्षी जून ते ऑगस्टदरम्यान बांधण्यात आला आहे.

चीन-पाकिस्तानची युती प्रबळ?
भारत पीओकेमधील रस्ते बांधणीवर आक्षेप घेत आहे. तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे, कारण चीनने रस्ता बांधल्यानंतर पाकिस्तान आणि चीन सामरिकदृष्ट्या भारतापेक्षा अधिक मजबूत होतील, ज्यामुळे देशातील तणाव वाढेल.

Web Title: China builds concrete road in Siachen; Satellite Image Reveals, India objected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.