महापालिका प्रवेशद्वारासमोर फेकला भाजीपाला

By Suyog.joshi | Published: April 19, 2024 06:37 PM2024-04-19T18:37:02+5:302024-04-19T18:38:30+5:30

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राच्या जवळ बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवनवर धडक दिली.

Throw vegetables in front of municipal entrance in nashik | महापालिका प्रवेशद्वारासमोर फेकला भाजीपाला

महापालिका प्रवेशद्वारासमोर फेकला भाजीपाला

नाशिक - महापालिका अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शहरातील भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला फेकत ठिय्या आंदोलन केले. यामुळे तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राच्या जवळ बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी राजीव गांधी भवनवर धडक दिली. या विक्रेत्यांनी सोबत आणलेला भाजीपाला, काकडी, कोथिंबीर, मिरच्या थेट प्रवेशद्वारावर ओतून देत आपला संताप व्यक्त केला. त्यांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले. आम्हाला फेरीवाला झोनमध्ये स्थान देऊन अन्यायकारक कारवाई थांबवा, अन्यथा विषप्राषण करू, असा इशारा नवसंघर्ष संघटनेने निवेदनाद्वारे मनपा प्रशासनाला दिला. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट असून अशा बिकट परिस्थितीत शेतकरी व शेतमाल विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर महापालिका अतिक्रमण विभागाकडून अन्याय होत आहे. त्यामुळे आमचे घर उघड्यावर आले आहे.

सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या ठिकाणी भाजी विक्रेते यांना हक्काचा व्यवसाय करण्यासाठी हॉकर्स झोन जागा मिळत नाही, तोपर्यंत अतिक्रमण विभागाने कारवाई थांबवावी, अशी मागणी भाजी विक्रेता संघटनेने केली आहे. निवेदनावर संघटना अध्यक्ष समाधान अहिरे, नितीन मुर्तडक, सुरेश टर्ले, राजू घोरपडे, सतीश बनसोडे, संपत पाटिल, सविता कराळे, मारुती वर्हाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Throw vegetables in front of municipal entrance in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक