Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 08:39 AM2019-10-18T08:39:56+5:302019-10-18T08:43:23+5:30

मनसेने महापालिका निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळविला होता.

Maharashtra Election 2019: Nashikar becomes 'Sentimental' by Raj's statement of settlement? | Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

Maharashtra Election 2019 : राज यांच्या ‘सेटलमेंट’च्या विधानाने नाशिककर खरंच ‘सेंटीमेंटल’ झाले?

googlenewsNext

- धनंजय वाखारे

नाशिक : ‘सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी कोठेही घरंगळून न जाणारा व सेटलमेंट न करणारा विरोधी पक्ष आपल्याला हवा आहे, असे विधान नाशिकच्या जाहीर सभेत करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नाशिकमधील सत्ताप्राप्तीचा इतिहासच सेटलमेंटवर रचला गेला आहे. आताही विधानसभा निवडणुकीत राज्यात मनसे-राष्ट्रवादी यांची छुपी युती काही मतदारसंघात समोर आली आहे, त्यात नाशिक पूर्वमधील सेटलमेंटचा समावेश आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणामुळे नाशिककर खूपसे सेंटीमेंटल झाले असतील, असे म्हणता येणार नाही. 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर 2009 मध्ये पहिल्यांदाच लढलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 13 जागांवर विजय संपादन करत दबदबा निर्माण केला होता.  या 13 आमदारांपैकी तीन आमदार नाशिक शहरातून निवडून गेले होते. विधानसभा निवडणुकीनंतर 2012मध्ये झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज यांच्या मनसेने पुन्हा एकदा करिश्मा दाखविला. विधानसभा निवडणुकीत मनसेची निर्माण झालेली हवा दोन वर्षानी झालेल्या महानगरपालिका निवडणुकीतही कायम राहिली. मनसेने महापालिका निवडणुकीत तब्बल 40 जागांवर विजय मिळविला होता. महापालिकेत मनसे सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष म्हणून उदयास आला होता. कॉँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 20, शिवसेनेने 19, भाजपने 14, माकपाने 3 जागांवर विजय मिळविला होता तर 11 उमेदवार अपक्ष  निवडून आले. 

मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून गेले असले तरी बहुमतासाठी अन्य पक्षांच्या कुबडय़ा लागणारच होत्या. राज्यात पहिल्यांदा महापालिकेत सत्तातुर झालेल्या मनसेने त्यावेळी पहिली सेटलमेंट केली तर भाजपशी. महापालिकेत भाजपबरोबर हातमिळवणी करत मनसेचा पहिला महापौर विराजमान झाला. आपण नव्हे तर भाजपनेच आपल्याला पाठिंबा देऊ केल्याचे नंतर राज सांगत राहिले. दरम्यान, भाजपबरोबर बिनसल्यानंतर मनसेने पुढील अडीच वर्षातही सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी पुन्हा सेटलमेंट केली ती राष्ट्रवादीबरोबर. महापौरपदाच्या निवडणुकीत ऐनवेळी वारे फिरले अन् भुजबळ फार्मवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानत राष्ट्रवादीसह कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी मनसेच्या उमेदवाराच्या पारड्या आपले वजन टाकले.

पाच वर्षे नाशिक महापालिकेची सत्ता उपभोगल्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेची मोठी वाताहत झाली. 40 पैकी तब्बल 31 नगरसेवकांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीत मनसेचे अवघे पाच नगरसेवक निवडून आले. सध्या नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. मनसेने भाजपच्या सत्ताकाळातही प्रभाग समितीच्या सभापतिपदासारख्या दुय्यम अशा पदासाठी सेटलमेंट केली आणि सातपूर, नाशिक पश्चिम विभागात सभापतिपदावर समाधान मानले. 

आता विधानसभा निवडणुकीत मनसे मैदानात उतरणार की नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती असल्यामुळे नाशिक पूर्वमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराने ऐनवेळी भाजपचे कमळ हाती घेतले. मनसेने नाशिक शहरातील चार जागांवर उमेदवार जाहीर केले; परंतु नाशिक पूर्वमध्ये ऐनवेळी आपल्या उमेदवारास माघारी घेण्यास लावत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपले बळ उभे केले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही आणखी एक सेटलमेंट नाशिककरांनी पाहिली व अनुभवली. त्यामुळे नाशिकमध्ये सेटलमेंटचा इतिहास असताना पुन्हा त्याच नाशिककरांसमोर राज यांनी आपल्याला सेटलमेंट न करणारा विरोधी पक्ष हवा आहे, असे विधान केल्याने नाशिककरांच्या भ्रुकुट्या वगैरे काही उंचावल्या गेल्या नाही तर राज यांच्या आणखी एका भाषणाची गंमत अनुभवली, असेच काहीसे म्हणावे लागेल. 

Web Title: Maharashtra Election 2019: Nashikar becomes 'Sentimental' by Raj's statement of settlement?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.