मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

By प्रसाद आर्वीकर | Published: March 15, 2024 05:09 PM2024-03-15T17:09:08+5:302024-03-15T17:10:09+5:30

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे.

Superfast rail travel from Marathwada; In April, all railways in Nanded division will be electrified | मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज होणार आहे.

रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात साधारणत: दीड वर्षापासून ही कामे सुरू असून, ती आता पूर्णत्वाला जात आहेत. विशेष म्हणजे, काही मार्गांवर आताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सद्य:स्थितीला नांदेड विभागातील ४५०.३९ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत: ४३ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण शिल्लक आहे. ही कामे काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात आहेत. ३१ मार्चपर्यंत या मार्गावरची संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार असून, एप्रिल महिन्यात नांदेड विभागातील सर्व रेल्वे मार्ग इलेक्ट्रिक रेल्वेसाठी सज्ज होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरून धावतात इलेक्ट्रिक रेल्वे
सध्या परळी-परभणी-छत्रपती संभाजीनगर या रेल्वे मार्गावरून ६ प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात. तसेच मुदखेड ते आदिलाबाद या रेल्वे मार्गावर एक प्रवासी रेल्वे आणि मालगाड्या इलेक्ट्रिक इंजिन जोडून धावतात.

पूर्ण झालेले विद्युतीकरण
अकोला जंक्शन ते पूर्णा : २०५.५९ किमी
परभणी ते परळी : ६२.१३ किमी
पिंपळखुटी ते मुदखेड जंक्शन : १८३.२६

३११ किमी झाली चाचणी
नांदेड-मनमाड या मार्गावर अंकाई ते मुदखेड जंक्शन हे ४२५ किमीचे अंतर असून, त्यापैकी ३११.२४ किमी अंतराची विद्युतीकरणाची चाचणी पूर्ण झाली आहे. परभणी तालुक्यातील मिरखेल ते नांदेड तालुक्यातील मालटेकडीपर्यंतची ४३.३० किमीची कामे शिल्लक आहेत.

Web Title: Superfast rail travel from Marathwada; In April, all railways in Nanded division will be electrified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.