नवेगाव-नागझिऱ्यात भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली

By निशांत वानखेडे | Published: April 15, 2024 06:17 PM2024-04-15T18:17:17+5:302024-04-15T18:18:03+5:30

वनविभागाने पुन्हा जीपीएस काॅलर लावून साेडले जंगलात : पण पहिलीचा शाेध लागला नाहीच

the tigress that got lost in navegaon nagzira was finally found | नवेगाव-नागझिऱ्यात भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली

नवेगाव-नागझिऱ्यात भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली

निशांत वानखेडे, नागपूर : जीपीएस काॅलर आयडी लावून नवेगाव-नागझिरा अभयारण्यात स्थानांतरित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भरकटलेली ‘एनटी-३’ वाघीण अखेर साेमवारी वनविभागाच्या शाेधपथकाला सापडलीच. वैद्यकीय पथकाच्या मदतीने वाघिणीला बेशुद्ध करून पुन्हा काॅलर आयडी लावण्यात आला व या अभयारण्यात निसर्गमुक्त करण्यात  आले. 

वाघांचे संवर्धन व स्थानांतरण उपक्रमाअंतर्गत या एनटी-३ वाघिणीला गुरुवार ११ एप्रिल राेजी नवेगाव-नागझिरा अभयारण्यात साेडण्यात आली हाेती. दुसऱ्या दिवशी काॅलर आयडीची लाेकेशन एकाच ठिकाणी दाखवित असल्याने वनविभागाने शाेध सुरू केला. व्याघ्र प्रकल्पातील व्हीएचपी चमु तसेच क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी शाेध माेहिम सुरू केल्यानंतर जीपीएस ट्रॅकरने दाखविल्याप्रमाणे अभयारण्यातील कक्ष क्रमांक ९५ मध्ये काॅलर आयडी तुटून पडल्याचे आढळून आले. त्यामुळे ही वाघीण भरकटल्याची बाब शनिवारी समाेर आली.

व्हीएचपी पथक, ताडाेबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पथक, जलद कृती दल व भारतीय वन्यजीव संस्था, देहारादून येथील पथकाच्या मदतीने दाेन दिवस शाेध घेतला. अखेर तिसऱ्या दिवशी साेमवारी सकाळी ९.३० वाजताच्या  सुमारास ही एनटी-३ वाघीण सापडली. यानंतर पशुवैद्यकांच्या मदतीने  वनविभागाच्या पथकाने वाघिणीला बेशुद्ध केल व त्यानंतर सॅटेलाईट जीपीएस काॅलर आयडी लावून नागझिऱ्यात निसर्गमुक्त केले. नागपूरच्या वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए. तसेच उपवनसंरक्षक व नवेगाव-नागझिराचे क्षेत्र संचालक प्रमाेदकुमार पंचभाई, उपसंचालक पवन जेफ यांच्या मार्गदर्शनात व ताडाेबाचे पशुवैद्यक अधिकारी डाॅ. रविकांत खाेब्रागडे यांच्या मदतीने वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले.

Web Title: the tigress that got lost in navegaon nagzira was finally found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ