गो-ग्रीन योजनेत नागपूरकर आघाडीवर

By आनंद डेकाटे | Published: May 6, 2024 04:58 PM2024-05-06T16:58:34+5:302024-05-06T16:59:54+5:30

विदर्भातील ५७,८५२ ग्राहकांनी बिलासाठी कागदाचा वापर केला बंद : एकट्या नागपुरातील १७ हजारावर ग्राहकांचा समावेश

Nagpurkar takes the lead in Go-Green scheme | गो-ग्रीन योजनेत नागपूरकर आघाडीवर

Nagpurkar takes the lead in Go-Green scheme

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
विदर्भातील ५७, ८५२ ग्राहकांनी वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर करणे पूर्णपणे बंद करून केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून महावितरणच्या पर्यावरणपुरक ‘गो-ग्रीन’ योजनेला प्रतिसाद दिला आहे. यात विदर्भात नागपूरकर आघाडीवर असून एकट्या नागपुरातील १७ हजारावर वीज ग्राहकांनी गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडला आहे.

या योजनेनुसार छापील वीज बिलाच्या कागदा ऐवजी फक्त ऑनलाईनचा पर्याय निवडल्यास वीजग्राहकांना प्रतिबिलात दहा रुपयांची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. महावितरणच्या संगणकीय प्रणालीद्वारे वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच ते ‘गो-ग्रीन’ योजनेतील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. ‘एसएमएस’द्वारे वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेऊन हे वीजबिल ऑनलाईनद्वारे भरण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नागपूर परिमंडलातील २०,४०८ ग्राहकांनी गो ग्रीन योजनेत आपला सहभाग नोंदविला असून यात नागपूर शहर मंडलातील १४,१७१, नागपूर ग्रामीण मंडलातील ३,२०१ ग्राहक गो ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. तर वर्धा मंडलामध्ये ३,०३६ ग्राहकांनी वीजबिलासाठी छापील कागदाऐवजी ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ला पसंती देत पर्यावरणपुरक पर्याय स्विकारला आहे. त्याखालोखाल अकोला परिमंडलातील १४,२१८, अमरावती परिमंडलातील १२,७५८, चंद्रपूर परिमंडलातील ५ हजार तर गोंदिया परिमंडलातील ५,००४ ग्राहकांनी कागदविरहीत असलेला हा पर्याय स्विकारला आहे.


- बिलाच्या रंगीत प्रिंटची ही सोय
वीज ग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महिन्याचे वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपी मध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या संकेतस्थळावर चालू महिन्याचे वीज बिल मूळ स्वरुपात उपलब्ध असते. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट घेण्याची सोय आहे.

- असे होता येईल योजनेत सहभागी
ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अॅवपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp लिंकवर जाऊन करावी. याबाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: Nagpurkar takes the lead in Go-Green scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.