आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेवर उत्तर सादर करा

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 24, 2024 05:25 PM2024-04-24T17:25:05+5:302024-04-24T17:27:22+5:30

Nagpur : हायकोर्टाचा सरकारला आदेश; सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त

High court asks to Submit answer on Alapalli-Sironcha road distance | आलापल्ली-सिरोंचा रोडच्या दूरवस्थेवर उत्तर सादर करा

Alapalli-Sironcha road

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या १०० किलोमीटर रोडच्या दूरवस्थेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने बुधवारी रस्ते, परिवहन व महामार्ग विभागाचे सचिव, वन महासंचालक आणि प्रधान मुख्य वन संवर्धक यांना दिले.

या रोडचा तातडीने विकास व्हावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महाराष्ट्र व तेलंगना राज्याला जोडणाऱ्या या रोडची जड वाहतुकीमुळे दूरवस्था झाली आहे. हा रोड जागोेजागी उखरला आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी, रोडवर अपघात होतात. धुळीमुळे वायू प्रदूषण होते व वाहनेही खराब होत आहेत. हे १०० किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल १० ते १२ तास लागतात. या रोडमुळे सुमारे ६०० गावांतील नागरिक त्रस्त आहेत. त्यांना वैद्यकीय गरजेच्या वेळी तत्काळ रुग्णालयात पोहोचता येत नाही. अहेरी व भामरागड परिसरातील रोड खूपच खराब झाला आहे. पावसाळ्यात या रोडने जाणे-येणे करणे अशक्य होते. रोडची दुरुस्ती करण्यासाठी जानेवारी-२०२३ मध्ये टेंडर जारी करण्यात आले होते. परंतु, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. मनोजकुमार मिश्रा यांनी बाजू मांडली.

Web Title: High court asks to Submit answer on Alapalli-Sironcha road distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.