शेतकऱ्यांच्या १७८ कोटीं रूपयांचा हिशेब द्यावाच लागेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 03:52 PM2023-12-02T15:52:06+5:302023-12-02T15:52:31+5:30

एका पक्षाचा लोकप्रतिनिधी असल्याने जनतेच्या वतीने प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

178 crore rupees of farmers will have to be accounted for, warned MP Sanjay Raut | शेतकऱ्यांच्या १७८ कोटीं रूपयांचा हिशेब द्यावाच लागेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या १७८ कोटीं रूपयांचा हिशेब द्यावाच लागेल, खासदार संजय राऊत यांचा इशारा

मालेगाव ( चंद्रकांत सोनार - नाशिक) : भारतीय संविधानाने मला बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यानुसार गिरणा साखर कारखान्यात गुंतवणूक केलेल्या १७८ कोटींच्या शेअर्सचा हिशेब मागितला. हिशेब मागणे हा गुन्हा नाही, तो अधिकार आहे. एका पक्षाचा लोकप्रतिनिधी असल्याने जनतेच्या वतीने प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मालेगाव येथील गिरणा सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी स्थापन केलेल्या कंपनीत १७८ कोटींच्या शेअर्सच्या रकमेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी मंत्री भुसे यांनी मालेगाव अपर व जिल्हा न्यायालयात खासदार राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. याप्रकरणी शनिवारी (दि.२) खासदार राऊत यांनी न्यायालयात आपली बाजू मांडल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री भुसे यांच्यावर टीका केली.

राऊत म्हणाले, भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना बचावसाठी शेतकऱ्यांकडून १७८ कोटी रूपये गोळा केले. याप्रकरणी केवळ हिशेब मागितला. वास्तविक, महाराष्ट्रातील सर्वच वृत्तपत्रात व विधानसभेत विषय आलेले आहे. परंतु, माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी आम्हाला खटल्याला सामाेरे जावे लागत असेल तर आमची तयारी आहे, असेही राऊत म्हणाले.

पुढील सुनावणी ३ फेब्रुवारीला

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट काढल्याने खासदार राऊत यांच्या विनंतीवरून त्यांना ५० हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. यावेळी राऊत यांनी दाखल केलेला दावा मान्य नसल्याचे न्यायालयात सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी ३ फेब्रुवारीला होणार आहे.

बाळासाहेबांचा शिवसैनिक; माफी मागणार नाही!

याप्रकरणात माफी मागितली तर तडजोड करण्यात येईल, असा प्रश्न खासदार राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्या आयुष्यात कधी कोणासमोर गुडघे टेकणार नाही, ईडीसमोर टेकले नाही. मंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रूपयांचा आधी हिशेब द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली.

आम्ही नावाचे दादा नाहीत

हिशेब मागितल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करतात. दादागिरी करतात. आम्ही देखील दादांचे दादा आहोत नावाचे नाही. आमचा जन्मच दादागिरीत झालेला आहे. आम्ही लढू आणि जिंकू. आगामी काळात अद्वय हिरे मालेगावचे आमदार होणार असल्याने ३ तारखेला न्यायालयात यावे लागेल.

न्यायालयात कार्यकर्त्यांना रोखले

खासदार संजय राऊत हे सकाळी ११ वाजता मालेगाव अपर व जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. राऊत यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात न्यायालयात गर्दी झाली होती.  कार्यकर्त्यांचा जमाव  जमल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाच्या प्रवेशद्वार बाहेर रोखले होते.

Web Title: 178 crore rupees of farmers will have to be accounted for, warned MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.