कथाकथन शैलीतील तारा निखळला; ज्येष्ठ लेखिका गिरिजा किर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:43 AM2019-11-01T01:43:51+5:302019-11-01T01:43:58+5:30

ज्येष्ठ लेखिका गिरिजा किर यांचे निधनाची वार्ता कळताच यवतमाळचे साहित्य वर्तुळ हळहळले.

The star in the storytelling genre disappears; Senior writer Girija Kir passes away | कथाकथन शैलीतील तारा निखळला; ज्येष्ठ लेखिका गिरिजा किर यांचे निधन

कथाकथन शैलीतील तारा निखळला; ज्येष्ठ लेखिका गिरिजा किर यांचे निधन

Next

मुंबई : सर्वस्पर्शी लिखाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. वांद्रे येथील साहित्य-सहवासमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

मराठी भाषेतील लेखिका आणि कथाकथनकार म्हणून नावाजलेल्या गिरिजा कीर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३३ रोजी धारवाड येथे झाला. कीर यांची १०५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात बालवाङ्मयाच्या २९ पुस्तकांचा समावेश आहे. किर्लोस्कर, प्रपंच, ललना आदी मासिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. कथा, कादंबरी, बालसाहित्य, नाटक, कविता आदी साहित्य प्रकार कीर यांनी हाताळले. आदिवासी मुलांसाठी सुरू असलेल्या शैक्षणिक प्रकल्पात त्यांनी १६ वर्षे काम केले. तर, सुमारे १२ वर्षे त्यांनी जन्मठेपेची शिक्षा भोगणाºया कैद्यांशी सुसंवाद साधला व त्यांचे समुपदेशन केले. त्या अनुभवांवर आधारित ‘जन्मठेप’ या पुस्तकाचे त्यांनी लिखाण केले. त्यांचे देश-परदेशात कथाकथनाचे दोन हजारांहून अधिक कार्यक्रम झाले.

१९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांचा लेखनाचा गौरव साहित्य परिषदेचा ह. ना. आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालयाचा कमलाबाई टिळक पुरस्कार, श्री अक्षरधन स्त्री साहित्यिका पुरस्कार, जन्मठेप या पुस्तकास पुण्याच्या ग्रंथोतेज्जक संस्थेचा पुरस्कार आदी पुरस्कारांनी झाला. त्याचबरोबर, वणीच्या पहिल्या लेखिका संमेलनाच्या उद्घाटक, बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, ठाणे जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

ज्येष्ठ लेखिका गिरिजा किर यांचे निधनाची वार्ता कळताच यवतमाळचे साहित्य वर्तुळ हळहळले. किर यांनी १९७५ मध्ये यवतमाळचे संमेलन गाजविल्याच्या आठवणी यावेळी ताज्या झाल्या. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी १९७५ मध्ये यवतमाळात आयोजित केलेल्या ‘मिनी साहित्य संमेलना’त गिरिजा कीर यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. त्यावेळी नाईक हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते ‘सोनाली’ नावाचे मासिकही चालवायचे. या मासिकाच्या वतीनेच यवतमाळच्या टाऊन हॉलमध्ये मिनी साहित्य संमेलन झाले होते. त्यात कथा कथनाचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळचे प्रत्यक्ष साक्षीदार अभय टोंगो म्हणाले, या कथा कथनात गिरिजा किर, शैलजा रानडे आणि प्रभा गणोरकर सहभागी झाल्या होत्या. गिरिजा किर यांनी सादर केलेल्या अप्रतिम कथेने त्यावेळी ‘वन्समोअर’ घेतला होता.

गिरिजाताई गेल्या हा आमच्यासारख्या त्यांच्या जवळच्या माणसांसाठी धक्का आहे.स्वभाव, वागणे हे त्यांच्या सुबोध कवितेसारखे होते. त्यांचे गद्य लिखाण हे त्यांनी आत्मीयतेने केलेले असायचे. लिखाणातला रसाळपणा, आत्मीयता, माणुसकी हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होत. - अरुण म्हात्रे, कवी

ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांना विनम्र श्रद्धांजली. नागपुरात त्या आवर्जून दोघांच्या आठवणी काढायच्या. त्यातले एक म्हणजे आधुनिक मराठी कथेचे एक प्रवर्तक वामनराव चोरघडे आणि दुसरे त्यांच्या साहित्य संमेलन निवडणूक प्रसंगी त्यांच्या मदतीला असणारे अविनाश पाठक. भरपूर वाचल्या जाणाºया मराठी लेखिकांमध्ये त्यांचे प्रमुख स्थान होते. - श्रीपाद भालचंद्र जोशी, साहित्यिक

अवघे आयुष्य साहित्याला वाहिलेल्या ज्येष्ठ लेखिका गिरिजा कीर यांच्या निधनाने मराठी साहित्याची अपरिमित हानी झाली आहे, त्यांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. कथा, कादंबरी, प्रवासवर्णन याचबरोबर बालसाहित्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

गिरिजा कीर यांची कथाकथनाची शैली ही अंतर्मुख करणारी आणि खिळवून ठेवणारी होती. त्यामुळे कथाकथन शैलीतील एक तारा त्यांच्या रूपाने निखळला. त्यांनी हरतºहेच्या शैलीतील लिखाण केले आणि विविध साहित्य निष्ठेने लिहिले. त्यांचे कैदी जीवनावरील लिखाण तर निश्चितच त्यांना इतरांपेक्षा वेगळे नेऊन ठेवते. - डॉ. महेश केळुसकर, ज्येष्ठ साहित्यिक

Web Title: The star in the storytelling genre disappears; Senior writer Girija Kir passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.