'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:13 PM2024-04-30T15:13:18+5:302024-04-30T15:13:42+5:30

PM Narendra Modi Speech: पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

pm narendra modi attack on ncp sharad pawar Ajit Pawar first reaction | 'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...

'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...

Ajit Pawar ( Marathi News ) : पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्सच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी पवारांवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील व्यासपीठावर होते. त्यामुळे मोदींच्या या टीकेशी ते सहमत आहेत का, असा प्रश्न त्यांना विरोधकांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'एएनआय' या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना मोदींनी केलेल्या टीकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, "मोदींनी कोणाबद्दल ती टीका केली, हे समजायला मी काही ज्योतिषी नाही. पण यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा सभा असेल आणि तिथे मी असेल तर त्यांना विचारतो तो की, भटकती आत्मा नेमकं कोणाला म्हणाले आणि कोणता उद्देश डोळ्यासमोर ठेवून म्हणालात. मोदींनी मला सांगितलं की मी तुम्हाला येऊन सांगतो," अशी तिरकस प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?

पुण्यातील सभेत शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, "ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली. तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत. १९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे," अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली. 

दरम्यान, नरेंद्र मोदींच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवार यांना कोंडीत पकडण्या प्रयत्न केला जात आहे. "मोदींनी केलेली टीका अजित पवार यांना मान्य आहे का?" असा खोचक प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि शिरूर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी विचारला आहे.
 

Web Title: pm narendra modi attack on ncp sharad pawar Ajit Pawar first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.