उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 06:15 AM2024-04-26T06:15:15+5:302024-04-26T06:16:03+5:30

आवश्यकतेनुसार मुंबई पोलिस दल आणि महापालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहा

Lok sabha Election 2024 - Candidates, be careful while demonstrating power; The cost of workers' cars will also be counted in the election expenses | उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार

उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. शक्तिप्रदर्शनावेळी मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही आता उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या, वाहने आणि केल्या जाणाऱ्या खर्चाची व्हिडीओसह छायाचित्रांची नोंद ठेवण्याचे निर्देश ‘दक्षिण मध्य मुंबई’चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत. 

ओल्ड कस्टम इमारतीच्या सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना पानसरे यांनी हे आदेश दिले. यावेळी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मुंबई शहर-जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या टप्प्यासाठी नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणूक स्वरूपात येत असतात. या कार्यकर्त्यांची संख्या, त्यांच्या वाहनांचे क्रमांक आणि वाहनांचा तपशील, मिरवणुकीदरम्यान वितरित होणारे खाद्यपदार्थ इत्यादींवर कडक आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवा. यासाठी आवश्यकतेनुसार मुंबई पोलिस दल आणि महापालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहा, असे आदेश पानसरे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांसोबत जास्तीत जास्त ३ वाहने 
आणि ५ व्यक्तींनाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्याची मुभा असेल, असेही पानसरे यांनी नमूद केले आहे. 

वाहनांवर झेंडे व प्रचार साहित्य लावण्यासाठी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि आरटीओ यांची परवानगी घेणे आवश्यक असते. ही परवानगी न घेता झेंडे लावल्याचे आढळून आल्यास सदर वाहने आचारसंहिता संपेपर्यंत अडकवून ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

Web Title: Lok sabha Election 2024 - Candidates, be careful while demonstrating power; The cost of workers' cars will also be counted in the election expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.