'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 01:24 PM2024-05-05T13:24:37+5:302024-05-05T13:29:42+5:30

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे यांच्या प्रचारसभेत राज ठाकरे सहभागी झाले होते.

Loksabha Election Vijay vadettivar criticism of Raj Thackeray from Narayan Rane campaign | 'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

Raj Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शनिवारी सभा घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह नारायण राणेंच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले विनायक राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी नारायण राणेंचे कौतुक देखील केलं. तर दुसरीकडे नुसतं बाकावर बसणारे खासदार पाहिजे की, केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे, असा टोला विनायक राऊत यांना लगावला. अशातच राज ठाकरे यांच्या या सभेबाबत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.

"मी नारायण राणे यांना आवाहन करतो, कोकणात फक्त हॉटेल आणि इंग्लिश कोचिंग क्लासेस आणा. कोणीही केरळ आणि गोव्याला जाणार नाही. सर्वजण इथेच येतील. नारायण राणे यांना मुख्यमंत्री असताना जेवढा वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी झपाट्याने कामे केली होती. जर पाच वर्षांचा कालावधी त्यांना मिळाला असता तर आज प्रचारासाठी कोणाला यायची गरज पडली नसती”, असं विधान राज ठाकरे यांनी केलं. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कोल्हापुरात बोलताना प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंनी जुने व्हिडीओ पाहावे - विजय वडेट्टीवार

 "नारायण राणेंच्या प्रचाराची पाळी राज ठाकरेंवर आली यातच त्यांचा विजय आहे. कारण एवढा मोठा योद्धा नारायण राणेंच्या मागे उभा आहे. निकाल लागल्यानंतर सगळं कळेलच. पण एक स्पष्ट आहे की कोण कुणाचंही कौतुक करत आहे. मला कळत नाही सकाळी नाश्ता करताना एका बरोबर असतात, दुपारच्या जेवणाला दुसऱ्या बरोबर, संध्याकाळी झोपायला गेलं की निघून जातात. राजकारण नासवण्याचं काम झालं आहे. राष्ट्रवादीचे घर फोडलं, आमच्याही नांदेडच्या खिडक्या काढून नेल्या. जे सुरु आहे ते नैतिकतेला धरून आहे का हे राज ठाकरे यांनी जुने व्हिडीओ काढून पाहावं आणि मग भाषण करावं," असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

"कामाचा सपाटा लावणे आणि झपाटल्या सारखे काम करणे काय असते? ते नारायण राणे यांच्याकडे बघून कळेल. बाळासाहबे ठाकरे हे नेहमी सांगायचे की अंतुले यांच्यानंतर जर कामाचा सपाटा लावणारे कोणी असेल तर नारायण राणे आहेत. नारायण राणे यांनी ज्या प्रकारे मुख्यमंत्रिपद हाताळले हे भल्याभल्यांना जमले नाही," असेही राज ठाकरे म्हणाले.

Web Title: Loksabha Election Vijay vadettivar criticism of Raj Thackeray from Narayan Rane campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.