मेरी आवाज ही पहचान है...; सप्तसूर पोरके झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 07:27 AM2022-02-07T07:27:41+5:302022-02-07T07:28:54+5:30

दाही दिशा, अष्टौप्रहर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जगाच्या पल्याड, सात सुरांच्याही पलीकडे नेणारा एक सूर म्हणजे लता मंगेशकर. करोडो रसिकांनी निगुतीने ९२ वर्षे जपून ठेवलेला हा स्वर रविवारी परमात्म्याने स्वत:कडे नेला.

Lata Mangeshkar Passes Away, Saptasur became an orphan | मेरी आवाज ही पहचान है...; सप्तसूर पोरके झाले...

मेरी आवाज ही पहचान है...; सप्तसूर पोरके झाले...

Next

मुंबई : दाही दिशा, अष्टौप्रहर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जगाच्या पल्याड, सात सुरांच्याही पलीकडे नेणारा एक सूर म्हणजे लता मंगेशकर. करोडो रसिकांनी निगुतीने ९२ वर्षे जपून ठेवलेला हा स्वर रविवारी परमात्म्याने स्वत:कडे नेला. निर्मळ मनाने गायलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्याला ज्यांनी अजरामर केले, अंगाई गीतापासून पसायदानापर्यंत सर्व भावभावनांना आपल्या गायकीने एका सूत्रात बांधले, असा भारतरत्न लता मंगेशकर नावाचा अजरामर इतिहास क्रूर काळाने मर्त्य मानवांच्या हातून हिसकावून नेला. कोरोनाचे निमित्त झाले आणि दीदींचे सूर आसमंत पोरका करून गेले. अनादी, आदिम असा हा सूर होता. ज्याने मानवी जीवनाचे समग्र, सर्वंकष दर्शन घडवले. भावभावनांचे असंख्य पदर दूर करत, निर्मळ सुख दिले. कधी मनाला हुरहुर लावणारे तर कधी हवेहवेसे वाटणारे हे जिवंत सूर घराघरांतल्या प्रत्येकाला पोरके करून गेले.

हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचे चिरंजीव आदिनाथ या दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला शिवाजी पार्क मैदानावर भडाग्नी दिला. आपल्या सुरांचे जगावर गारुड करणारे स्वर आकाशी झेप घेणाऱ्या ज्वालांनी कवेत घेतले तेव्हा प्रत्येकाचे डोळे भरून आले होते... खिन्न मनाने सगळे घराकडे परतत होते आणि "अखेरचा हा तुला दंडवत... सोडून जाते गाव..." हे दीदींचे स्वर प्रत्येकाचे काळीज कापून टाकत होते...

- जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे. मूळ गाव मंगेशी (गोवा), १९४२ मध्ये कारकीर्दीला सुरुवात
- ९५०+ पेक्षा अधिक चित्रपटांची गाणी गायली असून, ३६ पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये गायन. भारताची गानसम्राज्ञी अशी ओळख 
- १९४५ मध्ये लतादीदी मुंबईत आल्या. त्यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खान यांचा गंडा बांधला. 
- २००१ साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव.
- १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. 
- वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत नाटकात कामे केली. 
- दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात 'आपकी सेवा मे' या चित्रपटातील 'पा लागू कर जोरी रे' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायनाच्या प्रातांत पदार्पण केले. 

पहिले गायन सोलापुरात -
ही गानसरस्वती पहिल्यांदा गायिली ती सोलापुरात. तब्बल ८४ वर्षांपूर्वी, ९ सप्टेंबर १९३८ रोजी.त्या मैफलीचं वर्णन करायला आज कुणी हयात नाहीत; पण दीदींचा प्रदीर्घ गायनप्रवास सोलापुरातून सुरू झाला, हे सांगणारे अनेक जण आहेत. दूरचंच कशाला, गतवर्षीच्या मार्च महिन्यात दीदीनंच तसं ट्वीट करून त्या वेळचा फोटोही शेअर केेला होता.
 

Web Title: Lata Mangeshkar Passes Away, Saptasur became an orphan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.